लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अदानी समूहामध्ये एलआयसीने गुंतवलेले लोकांच्या कष्टाचे सुमारे ३६ हजार कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करून प्रदेश कॉंग्रेसने पाटो पणजी येथील एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कॉंग्रेसने गौतम अदानींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने लोकसभेत द्यावे, अशी जोरदार मागणी कॉग्रेसने केली. अदानी समूहाने लोकांचे पैसे लुबाडले, असा आरोपही त्यांनी केला.
कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, 'देशातील लाखो लोकांनी आपले कष्टाचे पैसे एलआयसीमध्ये गुंतवले आहेत. मात्र, त्यापैकी ३६ हजार कोटी रुपये एलआयसीने अदानी समूहामध्ये गुंतवले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलआयसीवर दबाव आणून हे पैसे गुंतवण्यास त्यांना भाग पाडले. अदानी समूहाचे शेअर्स पडल्याने लोकांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याचा जाब देण्याची गरज आहे. लोकसभेत खुली चर्चा व्हावी.'
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, 'गरिबांनी आपल्या कष्टाचे पैसे भविष्याच्या दृष्टीने एलआयसीमध्ये गुंतवले. मात्र, हे पैसे अदानी समूहामध्ये गुंतवण्यात आले. हिंडनबर्ग अहवालानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानींचे साम्राज्य कोसळत आहे. पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत. अदानी समूहामुळे कोळसा प्रदूषण, रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पांमुळे गोव्याच्या पर्यावरणाची वाट लागली आहे.' पक्षाचे नेते सुनील कवठणकर, अॅड. वरद म्हार्दोळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"