महामार्गांवरील खड्डयांबाबत काँग्रेसकडून संताप, आचारसंहितेचे कारण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:44 PM2019-05-09T19:44:03+5:302019-05-09T19:44:17+5:30
महामार्गांवरील खड्डे न बुजविल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात असून सरकारने आचारसंहितेचे कारण देऊन हे काम टाळू नये तसेच नव्याने निविदा काढण्याचीही गरज नाही, असे म्हटले आहे.
पणजी : महामार्गांवरील खड्डे न बुजविल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात असून सरकारने आचारसंहितेचे कारण देऊन हे काम टाळू नये तसेच नव्याने निविदा काढण्याचीही गरज नाही, असे म्हटले आहे. महामार्ग काँक्रिटीकरणासाठी लागणारी माती तसेच दगड यासाठी बेकायदा डोंगरकापणी चालली आहे, असा आरोप करण्यात आला.
पत्रकार परिषदेत प्रवक्ते अमरनाथ पणजीकर म्हणाले की, ‘राष्ट्रीय महामार्ग १७ अत्यंत घातक व जीवघेणा बनला आहे. कोणतेही नियोजन न करता या महामार्गाचे चौपदरीकरण हाती घेण्यात आले. चौपदरीकरणासाठी एव्हाना ८0 टक्के भूसंपादन पूर्ण व्हायला हवे होते, ते ५0 टक्केही झालेले नाही. या महामार्गालगत बांधलेले सर्विस रोडही धोकादायक बनलेले आहेत. महामार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी नव्या निविदा काढून लुटीचे कारस्थान चालले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पणजीकर म्हणाले की, ‘एकीकडे रस्त्याची ही दुर्दशा असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे. राजधानी पणजी शहरात लोकांना दोन तासही पाणी मिळत नाही. प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव म्हणाले की, 'दिल्ली, मध्यप्रदेश आदी ठिकाणी काँग्रेसच्या प्रचार कार्याच्या निमित्ताने माझे फिरणे झाले. देशात मोदी हवा नाहीच हे शंभर टक्के खरे आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढल्या'.