पणजी - गोव्याच्या रणजी क्रिकेट टीममध्ये शदाब जकाती, स्वप्निल अस्नोडकर यासारख्या उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना डावलून दोघा परप्रांतीय खेळाडूंचा समावेश केल्याबद्दल गोवाक्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलीकर यांचा निषेध करीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. सुरज लोटलीकर हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे खजिनदारही आहेत. गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी राजकारण आणले आहे आणि दलाली चालू केली आहे, असा गंभीर आरोपही पणजीकर यांनी केला. रणजी टीममध्ये समावेश केलेल्या असादुद्दिन मोहम्मद आणि अमित वर्मा या दोन्ही परप्रांतीय खेळाडूंची कामगिरी सुमार आहे त्यांनी कोणतीच चमक दाखवलेली नसताना त्यांना संघात का स्थान दिले, असा प्रश्न पणजीकर यांनी केला.
असादुद्दिन हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दिन याचा पुत्र होय. गोव्यात एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू असताना हैदराबादहून खेळाडू आयात करण्याची गरज अध्यक्षांना का भासली. गोंय, गोंयकार, गोंयकारपण हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे ब्रिद लोटलीकर विसरले काय, असा खोचक सवाल पणजीकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की, २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत शदाब जकाती हा गोवा फॉरवर्डचा स्टार प्रचारक होता. कोणत्याही व्यक्तीला वापरुन फेकून देण्याचीच गोवा फॉरवर्डची वृत्ती आहे काय, असा प्रश्नही त्यांनी केला.
शदाब जकाती याने या अन्यायाविरुध्द तोंड उघडले म्हणून त्याला त्याचे क्रिकेट करियर संपवू तसेच रणजी टीममध्ये आणि आयपीएलमध्ये कधीच समावेश होणार नाही हे पाहू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही पणजीकर यांनी केला. ते म्हणाले की, घेतलेले नवीन खेळाडू जर चांगल्या दजाचे असते तर आमची हरकत नव्हती परंतु त्यांची आजवरची कामगिरी अगदीच खराब आहे. जीसीएमध्ये दलाली आणि फिक्सिंग चालले आहे, असा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेस पणजी गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर तसेच एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.