नितीन गडकरींच्या व्हर्च्युअल मिटींगवर गोव्यात काँग्रेसकडून हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 02:46 PM2020-06-23T14:46:58+5:302020-06-23T14:49:29+5:30
पॅकेजही नाही आणि जीएसटीची भरपाईही नाही; केंद्राकडून गोव्याची बोळवण झाल्याचा आरोप
पणजी : केंद्र सरकारकडून गोव्याची बोळवण चालली आहे. राज्य शासनाने २ हजार कोटींचे पॅकेज मागितले होते ते मिळालेले नाही. जीएसटीची ७५0 कोटी रुपये भरपाईही केंद्राने दिलेली नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला असून केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जी व्हर्च्युअल मिटींग घेतली त्यावर टिकेची झोड उठवली आहे. चणेकार, खाजेकार तसेच अन्य लहान व्यावसायिकांचे लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचे साधन गेलेले आहे. मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, मासे विकणारे आदी व्यावसायिकही संकटात आहेत. या घटकांचा संयम सुटल्यास उद्या हे लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कामत म्हणाले की, ‘लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचे साधन गेलेल्या लहान घटकांना पॅकेजसाठी १00 कोटींची तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याबाबतही काहीच हालचाली झालेल्या नाहीत. राज्य आज बिकट स्थितीतून जात आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सामान्य माणूस तळमळत आहे. केंद्राने २0 लाख कोटी रुपये पॅकेज जाहीर केले त्यातून गोव्याला काय मिळाले? असा संतप्त सवाल कामत यांनी केला.
कामत म्हणाले की, ‘पेट्रोल, डिझेलचे दररोज वाढतच चालले आहेत. ६0 ते ७0 पैसे लिटरमागे वाढले आहेत. या महागाईत लोकांचे कंबरडे आणखीनच मोडले आहे. ‘गृहआधार’, ‘लाडली लक्ष्मी’ यासारख्या योजना ठप्प झाल्या आहेत.
माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी म्हादईचा प्रश्न उपस्थित करुन सरकारने म्हादईबाबत आजची स्थिती काय आहे हे जनतेसाठी जाहीर करावे, अशी मागणी केली. ते म्हणाले की, ‘कर्नाटकने पाणी वळविल्याने यंदा मे महिन्यात म्हादईच्या पात्रातील पाणी आटले. ही स्थिती कायम राहिल्यास भविष्यात समुद्राचे खारे पाणी थेट सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत पोचेल आणि गोवेकरांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही.’
राष्ट्रीयकृत बँका संंकटात येतात तेव्हा केंद्राकडून आर्थिक साहाय्य देऊन सावरल्या जातात. मात्र अडचणीत असलेल्या सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र सरकारचे कोणतेही धोरण नाही. महाराष्ट्रातील पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑप बँक वाचविण्यासाठी नीतीन गडकरी केंदीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहितात तर गोव्यातील सहकारी बँका वाचविण्यासाठी हे का होत नाही?, असा प्रश्न खलप यांनी केला.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गडकरींचे भाषण म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याची टीका केली. गोव्यात आजच्या घडीला ६८३ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असताना गडकरींनी गोव्याचा उल्लेख ग्रीन झोन असा कशावरुन केला? असा सवाल चोडणकर यांनी केला. बेरोजगारी तसेच लॉकडाऊनमुळे लोकांचा पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याबद्दल कोणतेही सोयरसूतक सरकारला नाही.’
आग्नेल फर्नांडिस म्हणाले की, ‘पर्यटन व्यावसायिक धास्तावले आहेत. हॉटेलमालकांकडून अर्ज घेतले परंतु अजून परवानगी दिलेली नाही. हॉटेले बंद आहेत तरीही वीज, पाणी बिले मात्र भरावीच लागत आहेत. टुरिस्ट टॅक्सी व्यवसायिक संकटात आहेत. सरकारने या घटकांसाठी काहीतरी करायला हवे.