पणजी : दृष्टी जीवरक्षकांच्या प्रश्नावर काँग्रेसने पर्यटन खात्याचे संचालक मिनिन डिसोझा यांना घेराव घालून जाब विचारला. संपकरी जीवरक्षक गोमंतकीय असून त्यांच्यावर अन्याय करु नका. त्यांना विनाविलंब सेवेत घ्या, अशी मागणी करण्यात आली. पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, जनार्दन भांडारी, युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर व इतर या आंदोलनात सहभागी
झाले होते. दृष्टी लाइफ सेविंंग ही खाजगी कंपनी आहे त्या कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करणे शक्य नसल्याचे संचालकांनी सांगताच आंदोलक आणखी नाराज झाले. जीवरक्षक संपावर गेल्याने किनाºयांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन महिन्यात १६ जणांचा बुडून अंत झाला. परंतु पर्यटन खाते किंवा भाजप सरकारला त्याचे सोयरसूतक नाही. गेले दोन महिनें जीवरक्षक संपावर आहेत. जीवरक्षकांना वेळेवर पगार दिला जात नाही तसेच कंत्राटातील तरतुदींचे पालन केले जात नाही याकडे लक्ष वेधण्यात आले.
पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांचे मिशन कमिशन चालले आहे, अशी टीका पणजीकर यांनी केली आहे. पर्यटन खात्यात प्रत्येक कामावर ३0 टक्के कमिशन घेतले जाते, असा आरोप त्यानी केला. घेराव घालण्याच्या या आंदोलनात विवेक डिसिल्वा, गौतम भगत, ग्लेन काब्राल, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, सुदिन नाईक, कुंभारजुवें गटाध्यक्ष विशाल वळवईकर, उबेद खान, साईश आरोस्कर, ज्ञानेश्वर बाळे, जॅकवान मुल्ला, आश्विन डिसोझा, फ्रँकी पिरीस, नौशाद चौधरी, राजेश बोंद्रे, वंश शर्मा, मॅन्युअल गोम्स आदी सहभागी झाले होते.