म्हापसा - राज्य विधानसभेतील रिक्त झालेल्या शिरोडा व मांद्रे मतदारसंघासाठीची पोटनिवडणूक कुठल्याही क्षणाला जाहीर होणारी असताना मांद्रेतील पोटनिवडणुकीत तेथील उमेदवारीवरुन मतदारात उत्सुकता तसेच विविध प्रकारे प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असल्याने तसेच भाजपाची उमेदवारी दयानंद सोपटे यांना दिल्यास माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भूमिका काय असेल असे विविध प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले असल्याने मतदारांच्या उत्सुकतेचे कारण ठरले आहे.
२०१७ साली घेण्यात आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक आलेले माजी आमदार सुभाष शिरोडकर तसेच दयानंद सोपटे यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे सादर करुन तीन महिन्यापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन जागांसाठी कोणत्याही क्षणी पोटनिवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणुकांची तारीख जाहीर होण्याच्या मार्गावर असताना भाजपा व काँग्रेस पक्षातील उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. इच्छुक असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारावर भर देण्यास आरंभ केला आहे. मात्र या दोन्ही पक्षाची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार यावर मतदारांचे डोळे लागून राहिले आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मांद्रे मतदारसंघातील भाजपाची उमेदवारी सोपटे यांना मिळण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे कोणती भूमिका घेणार यावर त्या मतदारसंघातील मतदारांत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपाची उमेदवारी न लाभल्यास पार्सेकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ते निवडणूक रिंगणातून माघार घेतील असा विश्वास सोपटे यांना वाटत आहे. तसे प्रयत्न व पार्सेकरांची मनधारणी करण्याचे काम पक्ष पातळीवर सुरु झाले असल्याची प्रतिक्रिया सोपटे यांनी दिली. मात्र पार्सेकरांनी माघार न घेतल्यास त्याचे परिणाम सोपटेवर होण्याची संभावना आहे. या दोघात उमेदवारी मिळवण्यावरुन वाद सुरू असताना ‘मांद्रे उदरगत’च्या झेंड्याखाली अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या मार्गावर असलेल्या जीत आरोलकर यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. सरकारातील घटक पक्ष असलेल्या मगोपने आपला पाठिंबा सुद्धा त्याला व्यक्त केला आहे.
या तिघांच्या शर्यतीत काँग्रेस आपला मतदारसंघ पुन्हा शाबूत ठेऊ शकतो काय असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या प्रश्नावरुन बरीच रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून आले आहे. मांद्रे मतदारसंघातून अनेकवेळा आमदार म्हणून निवडून आलेले अनुभवी राजकारणी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी आपल्या उमेदवारीवर दावेदारी सांगितली आहे. दुसरीकडे मागील अनेक निवडणुकीत उमेदवारीपासून डावलण्यात आलेले काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते उपाध्यक्ष बाबी बागकर हे सुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत. तसेच माजी शिक्षण मंत्री संगीता परब यांचे सुपूत्र उद्योजक सचिन परब हे सुद्धा प्रमुख दावेदारीतील एक मानले जातात. त्यामुळे उमेदवारी कोणाला दिली जाणार यावरुन मतदारांच्या मनात असंख्य प्रश्नासोबत बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. या सर्वांची चाचपणी काँग्रेसपक्षाकडून सुरु झाली असून मांद्रे मतदारसंघाताला काँग्रेसचा कोणता उमेदवार न्याय देवू शकेल त्याच्याच पारड्यात उमेदवारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.