लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने बूथस्तरीय बैठकांचा धडाका लावला आहे. दक्षिण गोव्यात आतापर्यंत ११ बुथांवर बैठका झालेल्या आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
भाजपने दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघावर यावेळी अधिक लक्ष केंद्रित केल्याने काँग्रेसनेही आपला हा गड हातचा जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे. बैठकांना प्रदेशाध्यक्ष स्वतः तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख वगैरे उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत.
पक्षाचे गोवा प्रभारी माणिकम टागोर काही दिवसांपूर्वी गोव्यात आले होते. त्यांनी प्रदेश समितीवरील पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते यांना काही सूचना केल्या. पाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वेळ्ळी, कुडतरी, फातोर्डा, दाबोळी, कुठ्ठाळी, मुरगांव, वास्को, फोंडा, कुडचडें, शिरोडा व सांगे गटांच्या बैठका झालेल्या आहेत.
१३ पासून उत्तरेत गाठीभेटी
१२ डिसेंबरपर्यंत दक्षिण गोव्यातील बुथांच्या बैठका संपतील. त्यानंतर १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत उत्तर गोव्यातील बुथांच्या बैठका सुरू होतील. काँग्रेसतर्फे येत्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई व गोव्याचे इतर प्रश्न प्रचारात प्रमुख मुद्दे असतील.