उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा उमेदवारी अर्ज सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:28 PM2019-04-01T13:28:33+5:302019-04-01T14:05:10+5:30
काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केला.
पणजी - काँग्रेसचेगोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत, रवी नाईक तसेच पक्षाचे इतर आमदार, पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते व काँग्रेसप्रणित एनएसयुआय संघटनेचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
भाजपाने आमदारांची फोडाफोडी करुन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चालवले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला असून आगामी लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात या विषयावरुन भाजपाला उघडे पाडू, असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘भाजपाने आरंभलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आमदार फोडून लोकांनी दिलेल्या कौलाचा भाजपा अवमान करीत आहे. एका अर्थी भाजपाने लोकांशी संघर्षाची भूमिका घेतली असून त्यामुळे या पक्षाला आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग लोकांनी बांधला आहे.’
चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात अलीकडेच सायकल यात्रा काढली. लोकांकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे उद्या मंगळवारी २ रोजी सकाळी ११.३0 वाजता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करतील. रविवारी (31 मार्च) सार्दिन यांच्या समर्थनार्थ दक्षिण जिल्हा काँग्रेस समितीने पक्षाच्या दक्षिण गोव्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली.