पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:42 AM2019-05-23T10:42:14+5:302019-05-23T10:45:05+5:30
काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना आघाडी
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत झालेल्या विधानसभेच्या पहिल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात हे आघाडीवर आहेत. पणजीत काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी पहिल्या फेरीत आघाडी प्राप्त केली आहे. मोन्सेरात यांना 507 मतांची आघाडी पहिल्या फेरीत प्राप्त झाली. त्यानंतरही मतांची आघाडी वाढत गेली व काँग्रेसच्या मोन्सेरात यांनी एकूण 1116 मतांची आघाडी घेतली. भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
पहिल्या फेरीत 507 मतांची आघाडी घेणारे बाबूश मोन्सेरात दुसऱ्या फेरीतही आघाडीवर राहिले. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी अजून संपलेली नाही. पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीची जागा रिकामी झाली. पणजी हा पंचवीस वर्षे भाजपचा बालेकिल्ला बनून राहिला पण या बालेकिल्ल्याला काँग्रेस पक्ष आता प्रथमच सुरूंग लावतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मतमोजणी पूर्ण होईल तेव्हाच अंतिम चित्र कळेल.
रायबंदरचा भाग हा पहिल्या फेरीत येतो. रायबंदरमध्ये एकूण साडेतीन हजार मतदार आहेत. रायबंदरचा भाग हा मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपचा बालेकिल्ला होता. यावेळी रायबंदरमध्ये बाबूशने मुसंडी मारली. मोन्सेरात यांनी 2 हजार 89 मतांची आघाडी प्राप्त केली. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी 2 हजार 383 मते प्राप्त केली. गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांना 175 मते प्राप्त झाली. आपचे वाल्मिकी नायक यांना वेलिंगकर यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. त्यांनी 153 मते पहिल्या फेरीत प्राप्त केली. नोटाला 59 मते मिळाली.