लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'स्मार्ट सिटी' कामांतील भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार नसेल तर या सर्व कामांची केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चौकशी करण्याचे धाडस दाखवावे, असे खुले आव्हान काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत दिले.
पुरी हे नुकतेच पणजीच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पणजीतील 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार नसल्याची टिप्पणी मंत्री पुरी यांनी केली होती. त्याला गोम्स यांनी प्रत्युत्तर दिले. भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने आपली हिंमत दाखवावी, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
गोम्स म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांव्दारे भाजपने भ्रष्टाचार सुरूच ठेवला आहे. मंत्री पुरी जेव्हा गोव्यात आले, तेव्हा त्यांनी स्मार्ट सिटी कामांचा बैठकीव्दारे आढावा घेतला. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी पणजीचा दौरा करून पणजीवासीयांच्या समस्या जाणून घेणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांनी सरकारचे मुखपत्र असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोव्दारे काँग्रेसने स्मार्ट सिटी कामांबाबत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन केले. स्मार्ट सिटी कामांचे सत्य त्यांनी जाणून घेणे गरजेचे होते, अशी टीका त्यांनी केली.
स्मार्ट सिटी कामांतील भ्रष्टाचार हा केवळ न्यायालयीन तपासच उघड करू शकतो. या कामांत भ्रष्टाचार झाला नसेल तर मग चौकशीचे आदेश देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? भाजप सरकारने हिंमत असेल तर त्यांनी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत भ्रष्टाचाराची चौकशी करावी. पणजीचे भाजप आमदार तथा मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी 'स्मार्ट सिटी'ची कामे दर्जाहीन असल्याचे मान्यही केले आहे. तरीही सरकार गप्प का, असा प्रश्न गोम्स यांनी उपस्थित केला.
यावेळी प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय भिके व पणजी महिला गटाध्यक्षा लविनिया डिकॉस्ता हजर होते.
सर्वांची चौकशी करा
स्मार्ट सिटी कामांतील भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव, मुख्य सचिव, महापालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटीचे अधिकारी हे सर्व दोषी आहेत. त्यामुळे या सर्वांची चौकशी व्हावी. मात्र, त्यांची चौकशी करण्याचे धाडस भाजप करणार नसल्याची टीका काँग्रेसने केली.