पणजी : फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार असून किमान दोन केबिनेट मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केला असून चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
चोडणकर म्हणतात की, एफडीएच्या मडगांव येथील महिला अधिका-याने दिलेला अहवाल खात्याच्या संचालक तसेच आरोग्यमंत्र्यांनी बाजुला ठेवून उलट या अधिका-यालाच लक्ष्य बनविले. या प्रामाणिक अधिका-याचा मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात खरे तर अन्न व औषध खातेच मुख्य आरोपी ठरते आणि आरोग्यमंत्री संशयाच्या घे-यात येतात. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी या एकूण प्रकरणाची चौकशी करावी.
चोडणकर म्हणतात की, तामिळनाडू, केरळ, गुजरात येथून आयात होणारी मासळी गोवेकरांच्या ताटात पडेपर्यंत १0 ते १५ दिवस लागतात. रसायनाशिवाय एवढे दिवस ही मासळी टीकून राहणे कठीण आहे. त्यामुळे फॉर्मेलिनसारख्या घातक रसायनांचा वापर होतो, हे निश्चित असे चोडणकर यांचे मत आहे.
एफएसएसएआयचे अधिकारी भास्कर यांनी फॉर्मेलिनच्या बाबतीत मर्यादेबाबत केला जाणारा दावा खोडून काढल्याने मंत्र्यांनी त्यावरही आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. मंत्री विश्वजित राणे यांनी मडगांवच्या एसजीपीडीए मार्केटमध्ये गाजावाजा करुन मासळीची तपासणी करुन घेतली. परंतु सासष्टीतील एकाही लोकप्रतिनिधीला बोलावले नाही. लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. परंतु सरकारला याबाबत उघडे पाडण्याच्याबाबतीत काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही, असे चोडणकर म्हणतात. एफडीएचा पर्दाफाश करणाºयांवर गुन्हे नोंदविण्याच्या धमक्या मंत्री देतात. परंतु गोमंतकीयांना फॉर्मेलिनयुक्त मासळी पुरविणा-या माफियांविरुध्द मात्र एकही गुन्हा नोंद केला जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
फॉर्मेलिनयुक्त मासळीची भीती अजूनही गोमंतकीयांच्या मनात आहे. त्यामुळे जोपर्यंत सुरक्षा उपाययोजना होत नाहीत. तोपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी घालावी, या मागणीचा चोडणकर यांनी पुनरुच्चार केला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात आयात केली जाणारी मासळी टिकून रहावी यासाठी या मासळीला फॉर्मेलिन लावले जात असल्याचे गेल्या जुर्ल रोजी उघड झाले होते. फॉर्मेलिन हे रसायन मानवी पार्थिव टिकून रहावे यासाठी मृतदेहावर लावले जाते. फॉर्मेलिनयुक्त मासळीचे सेवन केल्यास ते आरोग्याला धोकादायक ठरु शकते.