पणजी : किनाऱ्यांवरील जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे आणि दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीला किनारे सुरक्षा व्यवस्थेसाठी फेडलेले १४१ कोटी आणि किनाऱ्यांवरील साफसफाईच्या कंत्राटावर खर्च केलेले ६७ कोटी मिळून एकूण २0८ कोटी रुपयांची चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘जीवरक्षकांनी संपावर जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पर्यटन खात्याच्या कंत्राटात गौडबंगाल असल्याचा आमच्या आरोपाला परत एकदा बळकटी मिळाली आहे. व्यवस्थित व वेळेवर पगार मिळत नसल्यानेच जीवरक्षकांनी संपाचा इशारा दिला आहे. ताबडतोब सर्व जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे व माजी लष्करी किंवा माजी नौदल अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली किनारे सुरक्षा सेवा पुरवावी.
जीवरक्षकांनी त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा कंत्राटदाराकडून मिळत नव्हते असा गौप्यस्पोट केल्याने, सरकारने मागील पाच वर्षात किनारे सुरक्षा सेवेवर खर्च केलेले रु १४१ कोटी कुठे गेले याची चौकशी करणे गरजेचे आहे. किनारे सुरक्षा व जीवरक्षकाना वॉकी-टॉकी तसेच इतर उपकरणे कंत्राटदार देत नव्हता हे जीवरक्षकानी उघड केले आहे. कंत्राटदाराने किनाऱ्यांवर तैनात केलेल्या जीपगाड्यांचीही दुरुस्ती आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे देखील गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
कंत्राटात १४१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असूनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत गप्प आहेत. त्यावरुन सरकार पर्यटन मंत्री व सदर कंत्राटात सहभाग असलेल्या एका भाजप पदाधिकारी यांची पाठराखण करत असल्याचे सिद्ध होते.
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यानी १७ आॅगस्ट रोजी गोवा विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात मेसर्स दृष्टी लाईफ सेव्हिंगचे कंत्राट गेल्या ३0 जून रोजी संपले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही सेवा कोण पुरवीत आहे हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करणे गरजेचे असल्याचेही चोडणकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वेतन तसेच इतर भत्ते देण्यास होणारा विलंब आपल्या नियंत्रणाबाहेर असल्याचे दृष्टी कंपनीने म्हटले असून त्याबद्दल खेदही व्यक्त केला आहे. जुलैपासूनच्या पगारवाढीची प्रक्रिया चालू आहे. जे जीवरक्षक, कप्तान किंवा पर्यवेक्षक संपात सहभागी होणार नाहीत त्यांनाच ही वाढ दिली जाईल. शुक्रवारी जे कामावर हजर होते त्यांना थकबाकी सोमवारी दिली जाईल. दिवाळीला बोनस जाहीर करुन नोव्हेंबरमध्ये दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. काही जीवरक्षक गेले दोन दिवस कामावर आलेले नाहीत त्यांनी सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन कंपनीने केलेआहे. किनाºयांवर जीवरक्षकांचे काम चालूच असून गुरुवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये १३ जणांचे तर काल शुक्रवारी ४ जणांचे प्राण वाचविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.