लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : तत्कालीन काँग्रेस सरकारने देशाच्या हिताचा कधीच विचार केला नाही. सामान्य नागरिकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्यापासून वंचित ठेवले आणि त्यांच्या नेत्यांनी मात्र आपला स्वतःचा विकास साधला, असा आरोप भाजपचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी माशेल येथे कार्यकर्त्यांना करताना केला.
नाईक यांनी शनिवारी माशेल येथील श्रीदेवकी कृष्ण, खांडोळा येथील महागणपती मंदिरात जाऊन कार्यकर्त्यांसह देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर देवकीकृष्ण सभागृहात आयोजित केलेल्या प्रचारसभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, प्रियोळ मंडळ अध्यक्ष दिलीप नाईक, माजी सभापती अॅड. विश्वास सतरकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच जयेश नाईक, विशांत नाईक, शोभा पेरणी, प्रभारी विश्वंभर गावस, गोविंद पर्वतकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिषा गावडे व सचिव शिवराम नाईक उपस्थित होते.
यावेळी मंत्री गावडे, माजी सभापती सतरकर, श्रमेश भोसले, सरपंच जयेश नाईक यांनीही विचार व्यक्त केले. सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी स्वागत केले.