पणजी : राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर असताना लुईस बर्जर या सल्लागार कंपनीच्या सहभागाने जो भ्रष्टाचार झाला, त्या सर्वांची चौकशी करण्याचा निर्णय भाजपच्या सर्व मंत्री व आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात शुक्रवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदार, तसेच प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खजिनदार संजीव देसाई आदींनी भाग घेतला. विरोधी काँग्रेस पक्ष सध्या विविध प्रकारे सरकारवर आरोप करत आहे. काँग्रेसचे सरकार अधिकारावर असताना सी-लिंक प्रकल्प, जैका प्रकल्प, मोपा विमानतळ प्रकल्पाशी निगडित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची जलदगतीने चौैकशी केली जावी, अशी मागणी भाजपच्या बहुतेक मंत्री व आमदारांनी केली. सध्या गाजणाऱ्या लुईस बर्जरच्या सहा कोटींच्या लाच प्रकरणी पोलिसांच्या गुन्हा अन्वेषणकडून गतीने चौकशी करून घ्यावी व आरोपींविरुद्ध नावांसह लवकर गुन्हा नोंदविला जावा, अशीही मागणी आमदारांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती तत्त्वत: मान्य केली. बैठकीनंतर मुख्यमंत्री पार्सेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, क्राईम ब्रँचकडून आपल्याला तीन दिवसांत अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर गरज भासल्यास सीबीआयकडून चौकशी करून घेतली जाईल. आमदार विष्णू वाघ यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर असताना ज्या ज्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाला, त्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे भाजपच्या बैठकीत ठरले आहे. (खास प्रतिनिधी)
काँग्रेस काळातील भ्रष्टाचाराची चौकशी
By admin | Published: July 25, 2015 3:01 AM