Congress: अखेर गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार फुटले, फुटीर विधिमंडळ गट भाजपात प्रवेश करणार
By किशोर कुबल | Published: September 14, 2022 10:50 AM2022-09-14T10:50:18+5:302022-09-14T10:50:32+5:30
Goa Congress: काँग्रेसच्या आठ आमदारांचा फुटीर गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विधानसभा संकुलात सभापतींच्या दालनात पोहोचला आहे.
- किशोर कुबल
पणजी : काँग्रेसच्या आठ आमदारांचा फुटीर गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विधानसभा संकुलात सभापतींच्या दालनात पोहोचला आहे. सभापती रमेश तवडकर हे दिल्लीला असल्याने आठजणांचा हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना सादर करण्यात येईल.
केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमांव, हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा वगळता अकरापैकी अन्य आठ काँग्रेसचे आमदार सभापतींच्या कार्यालयात सकाळीच १० वाजताच पोहोचले.काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता आठ आमदार एकत्र आले आहेत. यात संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. संकल्प हे सुरुवातीपासून आपण काँग्रेसकडे निष्ठावान असल्याचे दाखवत होते. परंतु आता ते फुटीर गटाबरोबर आहेत.
फुटीर गटांमध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस व राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे.