लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोर धरून रणनीतीही ठरवली, गोवा दौऱ्यावर आलेले भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंशी 'डिनर डिप्लोमसी'ही केली. त्यानंतर विरोधी पक्षाला जाग आली असून काँग्रेसचे नव्यानेच नियुक्ती झालेले प्रभारी माणिकराव ठाकरे उद्या, मंगळवारी दोन दिवसांच्या गोवाभेटीवर येत आहेत.
या भेटीत ठाकरे पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांशी 'वन टु वन' चर्चा करणार असून लोकसभेसाठीही चाचपणी करणार आहेत. पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, गटाध्यक्ष यांच्याशीही स्वतंत्रपणे गाठीभेटी घेऊन ते चर्चा करणार आहेत. ठाकरे मंगळवारी दुपारी एक वाजता गोव्यात पोहोचतील. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी सुरू होतील.
बुधवारी, दि. १० रोजी ठाकरे हे दोन्ही जिल्हा कार्यालयांमध्ये पक्षाच्या गटाध्यक्षांकडे स्वतंत्रपणे चर्चा करतील. दोन दिवसांचा हा दौरा आटोपून परतल्यानंतर २० तारखेच्या दरम्यान ते पुन्हा गोव्यात येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत दोन ते तीन दिवसांच्या भेटीत जिल्हा तसेच राज्यस्तरावर पक्षाच्या बैठका होणार आहेत.
दरम्यान, काँग्रेसकडून नेहमीच उशिरा उमेदवार जाहीर केले जातात. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी तरी लवकर उमेदवार द्यावेत, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्याबद्दल काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांना, विचारले असता ते म्हणाले, 'उमेदवारीचा विषय हा एकाच राज्याचा नाही. पक्षाकडून केंद्रातून उमेदवारांच्या तीन-चार याद्या जाहीर केल्या जातात. गोव्याचे दोन्ही उमेदवार पहिल्या यादीत जाहीर होतील, असा आमचा प्रयत्न असेल.'
कार्लस व एल्टन समन्वयक!
दरम्यान, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी समन्वयक नेमले असून दक्षिण गोव्यात आमदार कार्ल्स फेरेरा, तर उत्तर गोव्यात आमदार एल्टन डिकॉस्ता यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीत संबंधित मतदारसंघांमध्ये दोघांनाही समन्वयकाची भूमिका पार पाडावी लागेल.
सर्वांची मते जाणून घेईन : ठाकरे
गोव्यात पक्ष वाढवण्याविषयी तसेच इतर रणनीतीच्या बाबतीत माझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत, त्या मी आमदार, प्रदेशाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांकडे बोलून दाखवीन, येत्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वांची मते जाणून घेईन,' असे ठाकरे यानी 'लोकमत'च्या या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.