लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : काँग्रेस पक्षामुळे गोव्याला घटक राज्य मिळाले. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर गोव्यात काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन घटक राज्य दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी केले.
फातोर्डातील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा जिल्हा खासदार फ्रांसिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, राज्य महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र, नौशाद व्यासपीठावर उपस्थित होते.
अमित पाटकर म्हणाले की, काँग्रेस पक्ष व या पक्षाचे सरकार गोव्यात व केंद्रात असताना गोव्याला जनमत कौल, कोकणी भाषा, घटक राज्याचा दर्जा मिळाला. घटक राज्य, कोकणी भाषा व एकूण गोव्याची अस्मिता राखून ठेवण्यासाठी आमचे नेते झटले. घटक राज्याचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांमुळे गोव्याला व देशाला खूप काही मिळाले. आज विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.
खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, आपण गोवा विधानसभेत मंत्री असताना गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळावा असा ठराव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, माजी राज्यसभा खासदार स्व. शांताराम नाईक यांनी ही मागणी केंद्रीय नेते, माजी पंतप्रधानांकडे मांडली व अखेर सर्वांच्या प्रयत्नांमुळे गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. एकूण गोव्याला आपला हक्क घटक राज्याचा दर्जा मिळण्यासाठी काँग्रेस पक्ष व या पक्षाच्या नेत्यांचे खूप मोठे योगदान आहे.
माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो म्हणाले की, गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रथम पंतप्रधानपदी मोरारजी देसाई असताना प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. त्यानंतर पंतप्रधानपदी इंदिरा गांधी असताना पुन्हा प्रयत्न सुरू केले असता, १९८७ साली राजीव गांधी यांनी आपल्याला गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आपली भाषा कुठली कोकणी की मराठी हे ठरवा, असे सांगितले. त्यानंतर सर्व काँग्रेसजनांनी केलेल्या प्रयत्नांमुळे घटक राज्याचा दर्जा मिळाला.