दोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 02:21 PM2018-10-19T14:21:15+5:302018-10-19T14:22:30+5:30

रविवार किंवा सोमवारी शिरोड्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नंतर तेथील गट समिती करण्यात येईल.

congress group committees dissolved in mandre and shiroda after 2 mlas left party | दोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित

दोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित

googlenewsNext

पणजी - सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे दोघे आमदारकी सोडून काँग्रेस मधूनही बाहेर पडल्याच्या आणि त्यांनी भाजपाप्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर अनुक्रमे शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघातील काँग्रेस गट समित्या आज विसर्जित करण्यात आल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ' मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक उद्या दुपारी ४ वाजता बोलावण्यात आली आहे. त्यानंतर नवी गट समिती स्थापन करण्यात येईल. शिरोडा मतदारसंघाच्या बाबतीत आज आणि उद्या या मतदारसंघात आम्ही दौरा करणार असून कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहोत. रविवार किंवा सोमवारी शिरोड्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नंतर तेथील गट समिती करण्यात येईल. विद्यमान गटाध्यक्ष बदलणार काय, या प्रश्नावर चोडणकर म्हणाले की 'तसे काही अजून ठरलेले नाही. विद्यमान गटाध्यक्ष पुन्हा अध्यक्ष बनू शकतात.'

काँग्रेसमधून बाहेर पडताना आपण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले असल्याचे शिरोडकर आणि सोपटे या दोघांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील किती कार्यकर्ते व पदाधिकारी शिरोडकर अथवा सोपटे यांच्याबरोबर आहेत, याची चाचपणी काँग्रेस करणार आहे. याबाबतीत गट समित्यांमधील ज्यांनी पक्षाशी दगाफटका केला त्यांच्यावर कारवाई करणार आहात काय, असे विचारले असता चोडणकर यांनी अधिक कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.

शिरोडकर आणि सोपटे यांनी दगाबाजी करून पक्ष सोडल्याची गंभीर दखल काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनीही घेतली आहे. पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे गोव्यात ठाण मांडून असून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. शिरोडा मतदार संघातील जिल्हा पंचायत सदस्य जयदीप जयकृष्ण नाईक शिरोडकर हे काँग्रेसच्या गळाला लागले आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, अशी माहिती मिळते. जयदीप यांनी गुरुवारी चेल्लाकुमार व चोडणकर यांच्याशी दीर्घ चर्चा केली. जयदीप हे अपक्ष म्हणून जिल्हा पंचायतीवर निवडून आलेले आहेत. त्यांचे वडील जयकृष्ण शिरोडकर हे मगो पक्षाचे माजी आमदार होते. १९७२ आणि १९७७ साली जयकृष्ण शिरोडकर हे शिरोडाचे आमदार होते. 
मांद्रे मतदारसंघातही काँग्रेस अशाच पद्धतीची चाचपणी  करीत आहे. तेथे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्वकीयांशी बँड पुकारल्याने काँग्रेससाठी ती जमेची बाजू ठरली आहे.

दरम्यान, ताज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षात आणखी कोणती फूट पडू नये तसेच काँग्रेसचे आणखी आमदार भाजपाच्या गळाला लागू नयेत यासाठी आपल्या सर्व १४ आमदारांना काँग्रेसने कांदोळी येथील हॉटेलात एकत्र ठेवले आहे.
 

Web Title: congress group committees dissolved in mandre and shiroda after 2 mlas left party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.