लोकसभेसाठी काँग्रेसकडे १६ नावे: अमित पाटकर, उत्तर व दक्षिणेतून प्रत्येकी ८ जण इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 01:11 PM2024-02-13T13:11:24+5:302024-02-13T13:11:46+5:30
उत्तर व दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रत्येकी आठ नावे आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे १६ इच्छुक उमेदवारांची नावे आली आहेत. या नावांवर प्रदेश काँग्रेसने चर्चा केली असून, ती छाननी समितीकडे पाठविल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उत्तर व दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रत्येकी आठ नावे आली आहेत. या नावांवर छाननी समितीची या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर ती नावे केंद्रीय निवडणूक समितीला पाठवली जातील व ही समिती नावे जाहीर करणार आहे.
पाटकर म्हणाले, वीज बिलांची वसुली, कसिनो थकबाकी, ग्रीन सेस आदी मिळून सरकारला ५ हजार कोटींची थकबाकी येणे आहे. एकीकडे लाभार्थ्यांना नियमितपणे अर्थसहाय्य नाही. तर दुसरीकडे इव्हेंटच्या नावाने ५०० कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोपही पाटकर यांनी केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कॅप्टन व्हिरियातो फर्नाडिस, विजय भिके व एम. के. शेख उपस्थित होते.
'भ्रष्टाचाराचा आरोप आणि समारोप' नाटक
अधिवेशनात सभापती रमेश तवडकर यांनी पक्षपाती बनून कामगिरी केली. सभापती म्हणून त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. काँग्रेसच्या तिन्ही आमदारांनी जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले. मात्र, सरकारकडून या प्रश्नावर योग्य उत्तर न देता केवळ फसवेगिरी केली. म्हादई, एसटी आरक्षण, बंद खाण व्यवसाय, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, जीवघेणे अपघात आणि इव्हेंटवरील वायफळ खर्च अशा मुद्द्यांवरून लक्ष वळविण्यासाठी भाजप सरकारनेच 'भ्रष्टाचाराचा आरोप आणि समारोप' हे नाटक केल्याची टीका त्यांनी केली.
दुरुस्ती विधेयकांविरोधात आंदोलन
सरकारने विधानसभेत मंजूर केलेली विविध दुरुस्ती विधेयके हे गोव्याची संस्कृती, पर्यावरण नष्ट करणारी आहेत. या विधेयकांना आमचा तीव्र विरोध असून, वेळ पडल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.