काँग्रेस गोव्यात अडचणीतच; आमदारांनी पक्ष खिळखिळा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:48 AM2023-12-25T09:48:19+5:302023-12-25T09:49:10+5:30

पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही.

congress in trouble in goa mla nailed the party | काँग्रेस गोव्यात अडचणीतच; आमदारांनी पक्ष खिळखिळा केला

काँग्रेस गोव्यात अडचणीतच; आमदारांनी पक्ष खिळखिळा केला

गोव्यात काँग्रेसने कोणताही नेता प्रभारी म्हणून दिला, तरी गोव्यातील काँग्रेसची गाडी रुळावर आणण्यासाठी बराच काळ लागणार आहे. हा पक्ष गोव्यात आमदारांनी खिळखिळा केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार भाजपमध्ये जात राहिले. त्यामुळे गोव्यात आता काँग्रेसची घडी पूर्ण विस्कटलेली आहे. पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही. आमदार गेले की, आमदारांसोबत कार्यकर्तेही पक्ष सोडून जातात, गोव्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अगदीच भुसभुशीत आहे. त्यामुळे फुटू पाहणाऱ्या आमदारांचेही फावते.

कालच्या शनिवारी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती गोव्यात काँग्रेसचे प्रभारी म्हणून झाली आहे. ठाकरे यांचे स्वागत, ठाकरे यांना गोव्यात काँग्रेससमोर कोणती कठीण आव्हाने आहेत हे लवकर कळून येईलच, माणिकम टागोर हेही गोव्यात काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांचे काम नीट सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याकडील गोव्याची जबाबदारी काढून घेतली गेली आहे. २०१२ पासून भाजपकडे सत्ता गेली आणि गोव्यातील काँग्रेसमध्ये मोठे स्फोट होणे सुरू झाले. आज काँग्रेसकडे फक्त तीन आमदार आहेत आणि त्यापैकी दोघे राजकीयदृष्ट्या संशयितच असल्यासारखे आहेत. भाजपकडून त्यांना ऑफर्स येत आहेत.

विरोधी बाकांवर बसून काँग्रेसचे काम पुढे नेणे हे दिव्यच असते. कारण, काँग्रेसचे राजकारण हे संघटनात्मक बळावर कधी चालत नाही, ते आमदाराचा प्रभाव आणि आमदाराकडील निधी याच्याच बळावर चालत असते. बाबू कवळेकर यांच्यासारखा नेता केपेतील तळागाळात पोहोचला होता, पण त्यांनीही काँग्रेस पक्ष सोडला. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. दिगंबर कामत यांच्यासारख्या आमदाराला मडगावमध्ये पराभूत करता येत नाही. एवढी त्यांची मतदारसंघावर पकड आहे, पण विरोधात तेही राहिले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये उडी टाकली, दिनेश गुंडू राव प्रभारी होते तेव्हा त्यांनी गोव्यात चांगले काम केले होते. काही नव्या उमेदवारांना हेरून तिकीटही दिले होते. मात्र, काहीजणांनी पक्षाला दगा दिलाच. 

संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, मायकल लोबो, रुदोल्फ फर्नाडिस वगैरेंनी लगेच काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला, काँग्रेस पक्ष ज्यांना विरोधी पक्षनेतेपद देतो, तो नेता हमखास फुटतो. रवी नाईकांपासून ती परंपरा २००० साली सुरू झाली, अगोदर मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात काँग्रेसची शकले उडवली व नंतर केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसला भगदाड पाडण्याचे उर्वरित काम पूर्ण केले, पूर्वी गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहूनदेखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघांमध्ये प्रबळ गट समित्या नाहीत. 

मडकई, प्रियोळ, म्हापसा, फातोर्डा असे अनेक मतदारसंघ आहेत, जिथे काँग्रेस सहसा जिंकत नाही. कुडतरीसारखा मतदारसंघही आज काँग्रेसकडे नाही. तिथे अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड हे आमदार आहेत. नावेलीसारखा मतदारसंघही काँग्रेसला राखता आला नाही. तिथे भाजपचे आमदार उल्हास नाईक हे नेतृत्व करत आहेत. कुडतरी, नावेली, साळगाव, पर्ये अशा विविध मतदारसंघांतून पुढे आलेले नेते एकेकाळी काँग्रेस सरकारमध्ये राज्यात मुख्यमंत्री होते. आज हे चार तसेच मडगावही काँग्रेसच्या ताब्यात नाही. 

आमदार गेल्यानंतर नवे उमेदवारही अशा मतदारसंघांत तयार झाले नाहीत. काँग्रेसचे है अपयश आहे. काँग्रेसचे पणजीतील काँग्रेस हाऊस केवळ निवडणुकीवेळीच गजबजत असते. काँग्रेसचे गोव्यातील सगळे पदाधिकारी केवळ पत्रकार परिषदा घेणे व पत्रके काढून प्रसिद्धी मिळवणे एवढेच काम करतात त्यांना गावोगावी पाठवून काँग्रेसचे काम वाढवून घेण्याचे कौशल्य कुणी प्रभारी दाखवतच नाही. पूर्वी काँग्रेसचे काही प्रभारी हे तिकीट वाटपात प्रचंड घोळ करायचे, आता नवे प्रभारी ठाकरे यांना गोव्यात खूप अनुभव येतील. काँग्रेसमधील सेटिंग व गटबाजीही कळून येईल, गोवा की काँग्रेस अजीब है असे कदाचित बोलण्याची वेळ त्यांच्यावर एक दिवस येईल.
 

Web Title: congress in trouble in goa mla nailed the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.