- नारायण गावस
पणजी : राज्यातील सरकारी आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेविरोधात कॉंग्रेस आक्रमक, पणजीतील आरोग्य खात्याच्या मुख्यालयावर घेराव घालत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचा आरोप करत कॉग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आरोग्य खात्याच्या संचालकांनी यावर स्पष्टीकरण देईपर्यंत खात्यासमोर बासून राहण्याचा इशारा दिला.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने खात्याचे उपसंचालक व इतर अधिकाऱ्यांशी तासभर बसून स्पष्टीकरण मागितले. पण त्यांना काहीच सांगता आले नाही. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर खात्यावर आरोप करत म्हणाले, राज्यातील चिखली, सांगे, कुडचडे, डिचोली, तुये अशा विविध सरकारी आरोग्य केंद्रावर व्यावस्थित आरोग्य सुविधा मिळत नाही. जनतेला चांगली आरोग्य सेवा पुरविली जावी यासाठी उच्च न्यायालयाने एक समिती नेमण्यास सांगितले होते.
या समितीत, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, दोन्ही जिल्हाधिकारी, तसेच बिन सरकारी संस्थेच्या सदस्यांचा समावेश असलेली ही समिती अजून नेमण्यात आलेली नाही. यावर आरोग्य खात्याकडे स्पष्टीकरण नाही म्हणजे आरोग्य खाते न्यायालयाचा अवमान करत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते विजय भिके म्हणाले फक्त इमारतींचे सौदर्यींकरण केले म्हणून चालत नाही त्यात जनतेला व्यावस्थित आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. फक़्त सरकारी इस्पितळे मोठी बांधली आहे. पण यात सुविधा योग्य मिळत नाही. आरोग्य संचालनालयाचे अधिकारी या विषयी काहीची बोलत नाही. आरोग्य खात्याचे संचालक आराेग्य मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय आपले स्पष्टीकरण देत नाही असे भिके म्हणाले.