गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड; प्रदेशाध्यक्षांसह इतरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By किशोर कुबल | Published: April 16, 2023 05:25 PM2023-04-16T17:25:53+5:302023-04-16T17:26:16+5:30
शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पणजी : म्हादईच्या बाबतीत केलेल्या विधानाचा निषेध म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणी निदर्शने करण्यासाठी येताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पक्षाच्या अन्य नेत्यांना बाणस्तारी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेसी नेत्यांना पोलिसांनी बाणस्तारी येथेच अडवले.
मंगळवारी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी प्रदेश राज्यकार्य करण्याच्या घेतलेल्या बैठकीत अमित शहांच्या सभेवेळी जोरदार निदर्शने करण्याचे ठरले होते. पाटकर यांच्यासह कॅप्टन विरियातो फर्नांडिस मोरेनो रीबेलो, सावियो डिसिल्वा, टोनी डायस व इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही काँग्रेसी नेत्यांना ते आहेत तेथे स्थानबद्ध करण्यात. प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर हे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. पोलिसांनी तेथेच त्यांना स्थानबद्ध केले. पोलीस सकाळपासून माझ्या मागावर होते असे पणजीकर यांनी लोकमतला सांगितले.
शहा यांच्या सभेच्या ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय मंगळवारी झाला होता. कर्नाटकला म्हादईवर पाटबंधारे प्रकल्पांसाठी डीपीआर मंजुरी व पाणी वळवण्यास गोव्याच्या सहमतीने मंजुरी दिलेली आहे, असे विधान शहा यांनी कर्नाटकात केले होते. त्याचा निषेध म्हणून त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी निदर्शने करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. सावंत सरकारने म्हादई कर्नाटकला विकली आणि शहा यांनी तसे स्पष्टपणे बेळगावच्या सभेत सांगितल्याने आणखी त्यांचे स्वागत कोणत्या तोंडाने करीत आहात? असा काँग्रेसचा सवाल आहे.
दरम्यान महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष बीना शांताराम नाईक, प्रदीप नाईक श्रीनिवास खलप, नितीन चोपडेकर व इतरांना फर्मागुढी येथे ताब्यात घेण्यात आले.
ही अघोषित हुकुमशाही - पाटकर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, ही अघोषित हुकूमशाही आहे व या कारवाईचा मी तीव्र निषेध करतो.