पणजी : काँग्रेस पक्षात बुधवारी मोठी फूट पडली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर यांच्यासह डिलायला लोबो अशा आठ आमदारांच्या गटाने काँग्रेसपासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. सत्ताधारी भाजपचे संख्याबळ वीसवरून अठ्ठावीसपर्यंत वाढले आहे.
८ आमदार आले भाजपमध्ये, पक्षात आता उरले केवळ तीनच
बुधवारी सकाळी ११ पैकी आठजण सभापतींच्या दालनात पोहोचले. सभापती रमेश तवडकर हे दिल्लीत असल्याने विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र सादर करण्यात आले. काँग्रेस आमदारांनी मात्र जनभावनेची पर्वा न करता पक्षांतर केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना दिगंबर कामत, लोबो वगैरे पुन्हा पक्षात आलेले हवे होते, त्याप्रमाणे पक्षांतर घडून आले.
देवानेच मला सांगितले : कामतमी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा देवाचा कौल घेतला. मी देवापुढे माझे गाऱ्हाणे मांडले, सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यानंतर आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. कामत म्हणाले की, राजकारणात परिस्थितीजन्य निर्णय घ्यावे लागतात. राज्याचा आणि माझ्या मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने मी प्रभावित झालो आहे. मोदींनी असे वातावरण निर्माण केले आहे की, देशाचा सर्वांगीण विकास होणार आहे.
काही मंत्र्यांना डच्चू? कामत कदाचित मंत्रिपद स्वीकारणार नाहीत. पण लोबो व इतरांना मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यासाठी भाजपच्या दोघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता असून ते दोन मंत्री कोण स्पष्ट झालेले नाही.
प्रचंड गोपनीयता काँग्रेस आमदारांचा गट विधानसभेत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी विधानसभेत संकुलाचे प्रमुख गेट्स बंद केले. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तेथेही पत्रकारांनाही प्रवेश नव्हता.
गट विलिनीकरणाची घोषणाकाँग्रेस विधिमंडळ गटाची अधिकृत बैठक होऊन विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे, असे फुटीर गटातील आमदार संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांनी सांगितले. आमोणकर हे विधानसभेत विरोधी पक्ष उपनेते आहेत. तर मायकल लोबो हे विरोधी पक्ष नेते होते. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ फसल्यानंतर लोबो यांना विरोधी पक्षनेते पदावरून दूर करण्यात आले होते. आठ आमदार एकत्र आल्यानंतर विधिमंडळ गटाने ठराव घेतला असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.