लोकसभा निवडणुकीनंतर सावंत सरकार कोसळणार; माणिकम टागोर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:22 AM2023-12-02T11:22:35+5:302023-12-02T11:22:53+5:30
लोक भाजपला कंटाळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात आमदारांना विकत घेऊन चाललेले सावंत सरकार लोकसभा निवडणुकीनंतर कोसळेल, असा दावा काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, लोक भाजपला कंटाळले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला लोक घरी पाठवतील व गोव्यातही सावंत सरकार कोसळेल. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या 'इंडिया' युतीने अजून राज्य स्तरावरील भूमिकेबाबत निर्णय घेतलेला नाही, असे टागोर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर स्पष्ट केले.
गोव्यात भाजपने विकत घेतलेले आमदार आता मंत्री बनू लागले आहेत व सावंत सरकारला प्रोटेक्ट करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना आपली जागा कळून चुकेल, असेही ते म्हणाले. गोव्यात काँग्रेसमध्ये गटबाजी चालू आहे. नेत्यांचे एकमेकांशी पटत नाही. त्याबद्दल विचारले असता टागोर म्हणाले की, हा चुकीचा समज आहे. काँग्रेस एकसंध आहे. आमचे सर्व स्थानिक नेते व कार्यकर्ते एकत्र आहेत. मतभिन्नता असू शकते, परंतु पक्षात एकदा निर्णय घेतला की सर्वजण शिरोधार्ह मानतात. पक्षात स्थानिक नेतृत्त्वबदलाबाबत काही चर्चा झाली का, या प्रश्नावर त्यांनी 'नाही', असे उत्तर दिले. ते म्हणले की, प्रदेश समितीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा मी आढावा घेतला आहे. तसेच काही ज्येष्ठ नेत्यांनाही वन टू वन भेटलो. त्यांची मते जाणून घेतली.
दरम्यान, पक्षाचे नेते एल्विस गोम्स म्हणाले की, हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार बनले आहे. १८ मिनिटांच्या शपथविधीवर ८ कोटी खर्च केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धावर १००० कोटींहून अधिक खर्च केले. परंतु, ७० टक्के खेळाडू बाहेरून आणले. गोवेकरांवर अन्याय केला. वेगवेगळ्या क्षेत्रात आमचे गोमंतकीय खेळाडू तयार व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. या सरकारची इव्हेंट्सवर उधळपट्टी चालली आहे व त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही होत आहे.
इच्छुकांनी संपर्क केला आहे का, उमेदवार कधी जाहीर करणार, या प्रश्नावर योग्यवेळी तिकिटे जाहीर केली जातील, असे त्यांनी सांगितले. उत्तर गोवा जिल्हाध्यक्षा विरोधात खंडणीप्रकरणी एफआयआर नोंद झालेला आहे. त्याबद्दल विचारले असता टागोर म्हणाले की, याप्रकरणी मी प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल मागितला आहे. तो आल्यानंतर काय ते ठरवू.'