खलप, भिकेंना डावलून भलत्यालाच तिकीट? उत्तर गोव्यात लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्लीत ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:10 PM2023-11-29T12:10:26+5:302023-11-29T12:10:56+5:30

तिकीट देण्याबाबतचा निर्णय हा दिल्लीत हायकमांड घेणार आहे.

congress nomination for lok sabha in north goa will be decided in delhi | खलप, भिकेंना डावलून भलत्यालाच तिकीट? उत्तर गोव्यात लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्लीत ठरणार

खलप, भिकेंना डावलून भलत्यालाच तिकीट? उत्तर गोव्यात लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्लीत ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : उत्तर गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप तसेच पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांना डावलून अखेरच्या क्षणी भलत्यालाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तिकीट देण्याबाबतचा निर्णय हा दिल्लीत हायकमांड घेणार आहे.

लोकसभेसाठी तसेच विधानसभा निवडणुकांवेळीही यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. शिरोडा विधानसभा मतदारसंघात पूर्वी अखेरच्या क्षणी महादेव नाईक यांना उमेदवारी दिली. म्हापशात सुधीर कांदोळकर यांना पक्षाने अशाच प्रकारे शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली. पणजीतही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक दक्षिण गोव्यातून एल्विस गोम्स यांना आणले. येथे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर तिकिटासाठी 'फ्रंट रनर' होते त्यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी एल्विस यांचे नाव जाहीर झाले.

प्रदेश काँग्रेसने उमेदवारांबाबत कितीही ठराव घेतले तरी अखेर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडूनच उमेदवार निश्चित केले जातात याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. त्यामुळे ठरावांना काहीच अर्थ उरत नाही.

बैठकीत काय ठरलंय

सोमवारी उत्तर जिल्हा काँग्रेसची बैठक झाली त्यात पक्षाबाहेरच्या व्यक्त्तीला तिकीट देऊ नये, असा ठराव घेऊन नरेश सावळ यांना विरोध करण्यात आला. पक्षाने तिकीट निष्ठावंतांनाच द्यावे, अशी मागणी करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, आमदार कार्लस फेरेरा, विजय भिके, उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, चंदन मांद्रेकर व इतर यावेळी उपस्थित होते. खलप व भिके तिकिटासाठी इच्छुक आहेत. उमेदवार हा पक्षाचा निष्ठावंत तसेच खंदा कार्यकर्ता असायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले. परंतु शेवटी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वच उमेदवारी- बाबत निर्णय घेत असते. गोव्यातून कितीही ठराव पाठवले तरी केंद्रात त्याला केराची टोपली दाखवली जाते.

रमाकांत खलप: ९० च्या दशकात मगोपच्या तिकिटावर उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ते केंद्रात केंद्रीय कायदामंत्रीही बनले होते. नंतरही त्यांनी लोकसभेसाठी निवडणुका लढवल्या परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

विजय भिके: हे गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हापशातून इच्छुक होते. परंतु अखेरच्या क्षणी काँग्रसने सुधीर कांदोळकर यांना तिकीट देण्यात आली. आता लोकसभेसाठी त्यांनी उत्तर गोव्यातून तिकिटावर दावा केला आहे.
 

Web Title: congress nomination for lok sabha in north goa will be decided in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.