पणजी : शहरात होऊ घातलेल्या प्रस्तावित ‘लॉजिस्टिक पार्क’ला कॉँग्रेसने विरोध केला असून या पार्कसाठी किती जागा लागणार, भूमिपुत्रांना किती नोकºया मिळणार, या नोकºया कोणत्या स्वरुपाच्या असणार तसेच या पार्कला लागणारे वीज, पाणी याची गरज कशी भागवणार यासंबंधीची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका आधी जाहीर करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘संसदेत एका खासदाराच्या लेखी प्रश्नावर मिळालेल्या उत्तरातून असे स्पष्ट झाले आहे की, देशभरात ३५ लॉजिस्टिक पार्क येणार असून एक पणजीतही येईल. शहरात रेल्वे लाइन नाही. कंटेनर टर्मिनल उभारल्यास मोठा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडणार आहे. जलमार्गाचा वापर करायचा झाला तर आधीच सरकारने शहरातील जेटी कसिनोवाल्यांना आंदण दिल्या आहेत आणि नवीन जेटी बांधण्यासाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पणजी ते रायबंदर कॉजवेपर्यंतचा विचार होऊ शकतो. तसे झाल्यास या वारसा स्थळावर तो घालाच ठरणार आहे. पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल.’
या नियोजित लॉजिस्टिक पार्कबद्दल स्थानिक महापालिकेला विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप करुन तिन्ही खासदार या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. ते झोपून आहेत, अशी टीका कवठणकर यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, ‘केंद्र सरकारला आजवर गोव्याने किती जमीन दिलेली आहे याची सविस्तर माहितीही श्वेतपत्रिकेतून दिली जावी. केंद्रीय आस्थापनांसाठी जमिनी घेतात आणि भूमिपुत्रांवर अन्याय करतात अशी टीका करताना ते म्हणाले की, एमपीटी किंवा विमानतळावर गोमंतकीयांना पुरेशा नोकºया मिळालेल्या नाहीत.