मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:08 PM2018-11-27T20:08:33+5:302018-11-27T20:09:14+5:30
मडगावातील जाहीर सभेनं होणार सांगता
पणजी : राज्यातील कोलमडलेले प्रशासन पूर्वपदावर यावे यासाठी मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे या मागणीसाठीचे आंदोलन आता काँग्रेसने हाती घेतले असून तालुकावार निदर्शने तसेच मडगाव येथे लोहिया मैदानावर जाहीर सभेतून या आंदोलनाची सांगता असा कार्यक्रम आखला आहे.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथील आझाद मैदानावर दिवसभराचे लाक्षणिक उपोषणाने सत्याग्रह केला. आमदार दिगंबर कामत, रेजिनाल्द लॉरेन्स, टोनी फर्नांडिस हे चोडणकर यांच्यासोबत काही वेळ बसले. पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार तसेच विविध पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर यांनी हे सरकार असंवेदनशील आणि बेजबाबदार झाले असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पर्रीकर आजारी पडल्यापाहून गेले नऊ महिने प्रशासन ठप्प झालेले आहे. खाणबंदीवर तोडगा निघालेला नाही. वित्त खात्याकडून फाइल्स संमत होत नाहीत. त्यामुळे विकासकामे अडलेली आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली मानधन बंद झाल्याने निराधार वृद्धांची परवड झालेली आहे. आमदारांना मतदारसंघांच्या विकासासाठी निधी मिळालेला नाही. शौचायले बांधून देण्याची योजना ठप्प झालेली आहे. बेकारांना नोकऱ्या नाहीत. लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सरकारच्या महत्त्वाच्या फाइल्सवर मुख्यमंत्री स्वत: सह्या करतात की अन्य कोण याबाबत संशय आहे. राज्यातील प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे.’
30 नोव्हेंबरला डिचोलीत, 1 डिसेंबरला पेडणेत
काँग्रेस हे आंदोलन पुढे नेताना बिगर शासकीय संघटना तसेच अन्य झळग्रस्तांना सोबत घेणार आहे. एका बाजुने ट्रोजन डिमेलो यांच्या याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात या प्रश्नावर न्यायालयीन लढाई सुरु आहे. दुसरीकडे आम्ही हे आंदोलन आता प्रत्येक तालुक्यात नेणार आहोत. येत्या ३0 रोजी डिचोली बस स्थानकावर तर १ डिसेंबर रोजी पेडणे येथे आंदोलन केले जाईल. या आंदोलनाची सांगता मडगांव येथील लोहिया मैदानावर जाहीर सभेने होणार आहे.
राजन घाटेंनी उपोषण सोडले
सलग अकरा दिवसांच्या अन्न त्यागामुळे प्रकृती खालावल्याने गोमेकॉत हलवावे लागल्यानंतर राजन घाटे यांनी मंगळवारी इस्पितळातच पत्नी दिपिका हिच्या हस्ते शहाळ्याचे पाणी पिऊन उपोषण सोडले. घाटे यांना सोमवारी सायंकाळी गोमेकॉत हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. घाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,‘उपोषण न सोडल्यास औषधांचा काहीही परिणाम होणार नाही आणि जिवाला धोका पोचू शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला त्यामुळे दुपारी मी पत्नीच्या हस्ते शहाळ्याचे पाणी पिऊन उपोषण सोडले.’ वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घाटे यांची प्रकृती आता स्थिर आहे.
गंभीर आजाराने त्रस्त असलेले मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अन्य मंत्र्याकडे द्यावा तसेच त्यांच्याकडील खातीही इतर मंत्र्यांना बहाल करुन प्रशासन पूर्वपदावर आणावे यामागणीसाठी गेल्या १६ पासून घाटे हे येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले होते.