पणजी : पक्षविरोधी कारवाया केल्याच्या सबबीखाली प्रदेश काँग्रेसने पणजी गट समिती विसर्जित केली आहे. तर दुसरीकडे गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर व अन्य तीन पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत आम्हीच पक्षातून बाहेर पडत आहोत, असे जाहीर केले. त्यानंतर दुपारी आमोणकर तसेच गट समितीचे सचिव हिनेश कुबल व युवा नेते शिवराज तारकर यांनी आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
काँग्रेसने नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी (एनआरसी) बाबतीत घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडल्याचे प्रसाद आमोणकर यांनी म्हटले आहे. २0१७ च्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बाबूश मोन्सेरात नंतर भाजपात गेले. त्यामुळे अध्यक्ष प्रसाद आमोणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी अलीकडे बाबुश तसेच भाजपसाठी वावरत होते. या पक्षविरोधी कारवायांची दखल काँग्रेसने घेऊन ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी काँग्रेसची संपूर्ण पणजी गट समिती विसर्जित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे.
काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तोफ; आम्हीच राजीनामे दिले : आमोणकर दुसरीकडे अध्यक्ष प्रसाद आमोणकर, हिनेश कुबल, शिवराज तारकर, जावेद शेख आदी पदाधिका-यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्यात आली. पक्षाच्या ध्येय धोरणे आम्हाला मान्य नाहीत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बाबतीत तसेच एनआरसी बाबतीत काँग्रेसने चुकीची भूमिका घेतली आहे, असे आमोणकर यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, ‘भारत देशाचे नागरिक म्हणून वरील कायद्याचे खरे तर आम्ही स्वागत करायला हवे, परंतु काँग्रेसने विरोध चालवला आहे. कुणाही भारतीय नागरिकाला या कायद्यामुळे अडचण येणार नाही तसेच अल्पसंख्यांकांनाही झळ पोहोचणार नाही. काँग्रेस हल्ली कोणत्याही विषयावर वहावत जाऊ लागली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय मान्य करायला तयार नाही.’ काँग्रेस पक्ष अफवा पसरवीत असल्याचा आणि प्रत्येक विषयावर राजकीय भांडवल करू पाहत आहे, असाही आरोप करण्यात आला.
आमोणकर म्हणाले की, पणजी गट समितीचे ३0 ते ४0 सदस्य आहेत. त्यापैकी आम्ही चारजण तातडीने राजीनामा देत आहोत, उर्वरित पदाधिकारीही एकेक करून राजीनामा देतील. भाजप आमदार बाबूश मोन्सेरात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे कारण त्यांनी केलेला विकास सर्वच लोक जाणतात. मध्यंतरी पणजीत आठ दिवस तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली तेव्हा त्यांनी पहाटे ३ वाजेपर्यंत टँकर पुरविले. कोणताही विषय ते तळमळीने हाताळतात. तसेच लोकांना कोणताही त्रास होऊ देत नाहीत. बाबुश यांची कार्यपद्धती आम्हाला आवडते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.'
भाजपा आता संघटना फोडू लागला : भिकेउत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी असा आरोप केला की, भाजपा आता काँग्रेस संघटनाही फोडण्याच्या कारवाया करु लागला आहे. परंतु हा सर्वात जुना पक्ष आहे. भाजपाला यात यश येणार नाही.
काँग्रेसचे पणजी मतदारसंघ प्रभारी धर्मा चोडणकर यांनी प्रसाद आमोणकर तसेच त्यांच्या इतर सहका-यांचा छुपा अजेंडा आहे, म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘या चौघांनी पक्ष सोडला असला तरी त्यांची राजीनामापत्रे अजून आम्हाला मिळालेली नाहीत. ते गेले तरी पक्ष कार्यकर्ते शाबूत आहेत. लवकरच पणजी गट समिती पुनर्गठित करणार आहोत.’
दरम्यान, काँग्रेसकडे चाचपणी केली असता अध्यक्षपदासाठी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचे पुत्र लादिमीर तसेच अन्य काही नावांची गट अध्यक्षपदासाठी चर्चा असल्याची माहिती मिळाली. लवकरच नवीन गट समिती स्थापन करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.