लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : देशात साठ वर्षांहून अधिक काळ सत्तेवर पूर्वी असलेला काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे त्यांनी संसदेतील कामकाज बंद पाडून सिद्ध करून दाखवले आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पक्ष म्हापशातील कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उपाध्यक्ष फ्रेंन्की कार्व्हालो तसेच महासचिव राजसिंग राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मणिपुरातील मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारकडून देऊनसुद्धा कामकाज बंद पाडून संसदेत गैरवर्तन करून फक्त सत्तेसाठीच हा पक्ष कसा आसुसलेला आहे, हे त्यांनी दाखवून दिल्याचे नाईक म्हणाले. मणिपुरात ज्या दंगली झाल्या. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न झाले आहेत. पण, त्या उलट त्यांच्या कार्यकाळात केंद्रात सत्तेवर असताना मोठ्या प्रमाणावर कशा दंगली झालेल्या व त्यावर त्यांचे सरकार कसे अपयशी ठरले होते, यावर हा पक्ष मात्र भाष्य करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्तेसाठी एकत्रित आलेले असंतुष्ट ....
भाजपचे विकासकार्य पाहता सद्यस्थितीत काँग्रेसला सत्ता मिळवणे कठीण आहे. त्या उलट पंतप्रधानांचे हात आणखी बळकट झाले आहेत. जगभरातील देशांकडून पंतप्रधानाच्या नेतृत्वाला मान्यता देण्यात आली असून, गेल्या नऊ वर्षांत देशाने अनेक मित्र तयार केले. पण, कॉंग्रेस पक्ष शेजारील काही देशांना हाताशी धरून पुन्हा सत्तेवर येण्याचा डाव रचत असल्याचाही आरोप नाईक यांनी केला. सत्तेसाठी एकत्रित आलेला विरोधी पक्षात अनेक नेते असंतुष्ट असल्याने ते एकत्रित राहणे कठीण असल्याचेही नाईक यावेळी म्हणाले.