गोवा विधानसभेत काँग्रेस पक्ष सतरावरून चारवर; पुन्हा बसणार दोन मोठे धक्के!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:15 AM2021-09-29T08:15:02+5:302021-09-29T08:16:20+5:30
फेब्रुवारी २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला होता. मतदारांनी भाजपची संख्या एकवीसवरून तेरापर्यंत खाली आणली होती. त्यावेळी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या.
सदगुरू पाटील -
पणजी : साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या काँग्रेस पक्षाने गोवा विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष म्हणून यश मिळविले होते, त्या काँग्रेसला गेल्या साडेचार वर्षांत खूपच गळती लागली. आज या पक्षाकडे केवळ चार आमदार शिल्लक राहिले आहेत. तर त्या चारपैकी दोघे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.
फेब्रुवारी २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला होता. मतदारांनी भाजपची संख्या एकवीसवरून तेरापर्यंत खाली आणली होती. त्यावेळी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. मात्र, राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यास त्यावेळी गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी विलंब केला होता. यामुळेच नितीन गडकरी हे गोव्यात येऊन भाजपप्रणीत आघाडीचे सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरले होते. संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यावेळी मनोहर पर्रीकर हे गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आले होते.