काँग्रेसच्या वचननाम्याने भाजपला हादरे: युरी आलेमाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 01:11 PM2024-04-23T13:11:28+5:302024-04-23T13:11:44+5:30
सरकारमध्ये चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असे आलेमाव म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव :काँग्रेसने आपला २१ वचनांचा गोवा केंद्रित जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, भाजपमध्ये भूकंप होत हादरे बसले. कला अकादमीची फॉल्स सिलिंग कोसळणे हा भाजपच्या गोटात आलेल्या भूकंपाचा पुरावा आहे. १९ एप्रिलला भाजपच्या पतनाला सुरुवात झाली आहे आणि ४ जूनला भाजप राजवट कोसळेल, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला.
नुकत्याच नूतनीकरण केलेल्या गोवा कला अकादमीमध्ये फॉल्स सिलिंग कोसळल्याच्या आणखी एका घटनेवर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे ही भाजपच्या विकसित भारताचे मॉडेल आहे, अशा शब्दात भाजपला फटकारले. या निवडणुकीच्या मोसमात निसर्ग आता भाजपचा भ्रष्टाचार उघड करीत आहे.
दोन दिवसांपूर्वी १५०० कोटींहून अधिक खर्च केलेल्या स्मार्ट सिटी पणजीला पूर आला होता. अटल सेतूवरील खड्यांमुळे भाजपच्या राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. ७५ कोटी खर्च केलेल्या अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली होती. सरकारमध्ये चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असे आलेमाव म्हणाले.