म्हापसा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा अवमान केल्या प्रकरणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कृतीचा प्रदेश काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. म्हापशातील गांधी चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करुन हा निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेशात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतिने महात्मा गांधीच्या प्रतिमेचा अवमान करताना नथुराम गोडसेंचा उदात्तीकरण करण्याची पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यात येत असला तरी गांधीजींचे विचार, अहिंसेची शिकवण, त्यांनी देशासाठी केलेला त्याग, दिलेले बलिदान लोकांच्या मनातून काढले जाऊ शकत नसल्याचे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी प्रदेश महिला अध्यक्षा अॅड. प्रतिमा कुतिन्हो, आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रवक्ता अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस तसेच इतर विविध आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना घटनेचा निषेध केला. तसेच या प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई करण्यास केंद्राला आलेल्या अपयशाचा सुद्धा त्यांनी निषेध केला. केंद्रात असलेल्या भाजपच्या समर्थनामुळे हिंसेवर विश्वास ठेवणा-या भाजपा सरकारामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोपही यावेळी बोलताना केला. घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे आरोपही यावेळी त्यांनी केले.
घडलेला प्रकार हा निंदनीय असून गांधीजींचे विचार आजही देशात कायम असल्याचे तसेच राहणार असल्याचे झालेल्या प्रकारातून सिद्ध होत असल्याचे अमरनाथ पणजीकर म्हणाले. झालेल्या या प्रकारातून नव्या पिढी समोर कोणता आदर्श ठेवला जातो असा प्रश्न आमदार हळर्णकर यांनी केला. देशात घडलेला हा लाजीरवाणा प्रकार असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी यांचे समर्थन करणा-या घोषणा दिल्या. तसेच केंद्र सरकारचा निषेध करणारी घोषणाबाजी केली.