मडगाव: बर्ड फ्ल्यू प्रसार होत असल्याचा दावा करून गोव्यात चिकन आणि कोंबड्या आयात करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बंदी जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामागे काही छुपा अजेंडा तर नाही ना? असा सवाल केला आहे .
यासंबंधी चोडणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 21 दिवसांच्या संचारबंदीच्या पहिल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाजार बंद करून लोकांना वाटण्यास जीवनावश्यक वस्तू केवळ आपल्या कार्यकर्त्यांकडेच असतील याची काळजी घेतली. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना आता अंडी आणि चिकन बंद करून नंतर या वस्तू आपल्या कार्यकर्त्यांकडून वाटायच्या आहेत का? असा सवाल केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे चिकन खाणे आणि बर्ड फ्ल्यू यांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही बंदी नेमकी कशासाठी याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.