लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भुतानी व जुआरी जमीन घोटाळा या महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष वळविण्यासाठी धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. सुभाष वेलिंगकर यांच्याशी सरकारची हातमिळवणी असून, तेच वेलिंगकरांना लपण्यासाठी मदत तर करीत नाहीत ना? असा सवाल काँग्रेसच्या सह प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वेलिंगकरांनी आक्षेपार्ह विधान केले. यामुळे गोव्यात तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेस सुध्दा या आंदोलनात उतरले. मात्र इतके होऊनही मुख्यमंत्री व पोलिस खाते गप्प कसे काय? वेलिंगकर हे आरएसएसचे माजी संघचालक आहेत. त्यामुळेच त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, की जमीन भू- रुपांतर, डॉगरफोड आदी विषयांवरील लक्ष वळवण्यासाठी भाजप सरकारने वेलिंगकरांचा विषय तयार केला आहे.
यावेळी दक्षिण गोवा खासदार कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव व हळदोणेचे आमदार अॅड. कार्ल्स फरेरा उपस्थित होते.