मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून विश्वजित बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 11:52 AM2019-01-03T11:52:58+5:302019-01-03T11:59:01+5:30
ऑडीओ क्लीपमधील आवाज कुणाचा आहे हा प्रश्न अधिकृतरित्या अनुत्तरीत असला तरी, गोवा प्रदेश भाजपा त्या टेपनंतर सून्न झाला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ते क्लीप प्रकरण धक्कादायकच ठरले आहे अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे.
पणजी - ऑडीओ क्लीपमधील आवाज कुणाचा आहे हा प्रश्न अधिकृतरित्या अनुत्तरीत असला तरी, गोवा प्रदेश भाजपा त्या टेपनंतर सून्न झाला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ते क्लीप प्रकरण धक्कादायकच ठरले आहे अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे. आता मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य स्पर्धेतून मंत्री विश्वजित राणे हे बाद ठरल्याचे भाजपामधील एका गटाकडून व विरोधी काँग्रेसकडूनही मानले जात आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निवासस्थानी तीन तास पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नोकर भरतीवरून चर्चा झाली होती, विशेषत: वीज खात्यातील भरतीवरून चर्चा झाली होती, असे अन्य काही मंत्र्यांकडून सांगितले जाते. मात्र वीज मंत्री निलेश काब्राल यांच्या मते क्लीपमध्ये जसा विषय आला आहे तशा प्रकारे चर्चा झाली नव्हती. सध्या प्रत्येक मंत्रीही बाहेर काही बोलताना खूप काळजी घेऊ लागले आहेत. आपणही ऑडीओ क्लीपसारख्या एखाद्या वादात सापडायला नको म्हणून काळजी घेणे योग्य असे मंत्र्यांनी ठरवूनच टाकले आहे. मंत्रिमंडळ बैठकीवेळी राफेलचा विषय आला व सगळी माहिती आपल्याकडे इथे बेडरूममध्ये आहे असे पर्रीकर यांनी नमूद केले असे मंत्री राणे यांनी सांगितल्याचे काँग्रेस पक्ष एका ऑडीओ क्लीपच्या आधारे सांगतो. मात्र तो आवाज आपला नाही, तो काँग्रेसचाच बेबनाव आहे असे मंत्री राणे यांचे म्हणणे आहे. राणे यांनी पोलीस चौकशीही मागितली आहे पण पोलीस खात्याने अजून या विषयाची दखल घेतलेली नाही.
मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने यापुढील काळात जर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले तर त्यांच्या जागी कुठच्या नेत्याची वर्णी लावावी हे ठरविणे आता भाजपाला सोपे जाईल असे मानले जात आहे. मंत्री राणे व साखळीचे आमदार प्रमोद सावंत हे दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. भाजपाने सावंत यांनाच या शर्यतीत महत्त्व दिलेले आहे. ऑडीओ क्लीपमधील आवाज कदाचित राणे यांचा नसेलही पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा यापुढे त्यांच्या नावाचा विचार करू शकणार नाही,अशी चर्चा सावंत यांचे समर्थक असलेल्या काही आमदार व मंत्र्यांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, ऑडिओ क्लीपने अकारण तणाव निर्माण केला असे मंत्री काब्राल यांचे म्हणणे आहे.