पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारला मोठा धक्का बसणार आहे. भाजप कडून सांगण्यात येणारे ४०० पार मुळीच शक्य नसून त्यांना ३०० पार सुद्धा होणे अशक्यच आहे, तर २०० पार होणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. देशात पहिल्या दोन टप्यात झालेल्या निवडणुक मतदानाचा आढावा घेतल्यास कॉंग्रेससाठी चांगली गोष्ट असल्याचे दिसून येत असून पहिल्या दोन टप्यातील आढावा भाजपचा पराभव होणार असल्याचे संकेत देत असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरुर यांनी सांगितले.
गुरूवारी (दि.२) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरूर यांचे गोव्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आगमन झाले. विमानातून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर तेथे त्यांचे एल्वीस गोंम्स आणि गोव्यातील इतर कॉंग्रेस नेत्यांनी स्वागत केले. एका जाहीर सभेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढची पन्नास वर्षे गोव्यात आणि भारतात कॉंग्रेसचे सरकार येणार नसल्याचे भाषणातून सांगितले होते. त्याबाबत पत्रकारांनी शशी थरुर यांना विचारले असता भाजपने त्यांचा ज्योतीषी बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. देशात झालेल्या पहिल्या दोन टप्यातील मतदानाचा आढावा घेतल्यास कॉंग्रेस पक्षासाठी चांगले संकेत देत असून निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी भारतात कॉंग्रेसचा प्रचार एकदम चांगल्या पद्धतीने होत असून मोठ्या प्रमाणात जनतेचा कॉंग्रेसला पाठिंबा मिळत आहे. भाजप कडून करण्यात येणारे ४०० पार ची घोषणा सत्य होणे शक्य नाही. त्यांना ३०० पार सुद्धा होणे अशक्य असून २०० पार होणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल असे ते म्हणाले. पहिल्या दोन टप्याचा आढावा घेतल्यास भाजपचा पराभव होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली.