पणजी - राज्यातील भाजप सरकार जर बरखास्त करायची काँग्रेसची इच्छा असेल व तशी धमक जर असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे असे आव्हान भाजप देत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्री माविन गुदिन्हो व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत बोलताना तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेस पक्षाचे आमदार संघटीत नाहीत. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे दोघे आमदार अगोदरच राजीनामे देऊन भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. काही तथाकथित बुद्धीवाद्यांनी व काँग्रेसने मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या खासगी निवासस्थानी मंगळवारी जो मोर्चा काढला, त्या मोर्चाला नऊ आमदार गेले होते. अन्य पाच आमदार का गेले नाहीत याचा शोध काँग्रेसने घ्यावा. त्या मोर्चाला लोकांपेक्षाही जास्त पोलिसच होते. जर मोर्चा काढायचाच होता तर निदान काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराने किमान पंचवीस तरी लोक आणायला हवे होते. फक्त 60-70 व्यक्तींना घेऊन मोर्चा काढला गेला. दिगंबर कामत यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही ह्या मोर्चात सहभागी होत असल्याने कामत यांची आम्हाला किव येते.
तेंडुलकर म्हणाले, की मुख्यमंत्री र्पीकर यांनी आजाराचे सोंग घेतलेले नाही. ते खरोखर आजारी आहेत व अशावेळी त्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेणो हे गैर आहे. आम्ही काँग्रेसच्या मोर्चाचा निषेध करतो. तथाकथित बुद्धीवादीही मोर्चात सहभागी झाले होते. यापूर्वी देशातील विविध राज्यांमध्ये स्व. जयललिता, बिजू पटनाईक आदी अनेकजण मुख्यमंत्रीपदी असताना आजारी पडले होते पण त्यांच्या निवासस्थानी कुणी मोर्चा नेला नव्हता. पंडित जवाहरवाल नेहरूही पंतप्रधानपदी असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता व ते तीन वर्षे आजारी होते पण त्यावेळच्या विरोधी पक्षांनी त्यांच्या घरी मोर्चा नेला नव्हता किंवा त्यांचा राजीनामा मागितला नव्हता. काँग्रेस पक्ष प्रसिद्धीसाठी मोर्चाचे नाटक करत आहे.
उपोषणाचा परिणाम नाही
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राजन घाटे यांनी आझाद मैदानावर उपोषण चालविले आहे. ते मुळात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ते आरटीआय कार्यकर्ते नव्हे. त्यांना काँग्रेस पक्षाचीच फुस आहे. त्यांनी शक्य आहे, तोर्पयत उपोषण सुरूच ठेवावे. भाजपवर किंवा सरकारवर त्यांच्या उपोषणाचा काहीही परिणाम होणार नाही. तसेच काँग्रेस नेत्यांनीही घाटे यांच्यासोबत बसणोही सुरूच ठेवावे, असा उपहासात्मक सस्ला तेंडुलकर यांनी दिला. दरम्यान, 2019 साली मोदी सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा अधिकारावर येईल व त्यावेळी कदाचित गोव्यातील सगळे काँग्रेस आमदार भाजपमध्ये येऊ पाहतील, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.