लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सरकारी नोकरी विक्री प्रकरणी काँग्रेसकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे मंत्री व सरकारवर आरोप केले जात आहेत. त्यांनी तथ्य तपासूनच आरोप करावेत, असे प्रदेश भाजपचे प्रवक्ते अॅड. यतिश नायक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारी खात्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरभरती झाल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी मंत्र्यांचे नाव घेतले. एकूणच ज्या खात्यांशी संबंधित त्यांनी कागदपत्रे दाखवली होती, त्यावरून ते मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर आरोप करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. नायक म्हणाले, केवळ काही तरी करायचे म्हणून काँग्रेसने आरोप करू नयेत. त्यांनी अगोदर तथ्य तपासून पाहावे. पाटकर यांनी दाखवलेली कागदपत्रे बनावट असल्याचे ते स्वतःच सांगतात. तर मग ते कुठल्या आधारे आरोप करतात. उलट या आरोपांनंतर मंत्री राणे यांनीच या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहावी म्हणून पोलिस महासंचालक व सायबर गुन्हे कक्षाच्या निरीक्षकांकडे ९ नोव्हेंबरला तक्रार केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कईकर उपस्थित होते.
सरकारनेच कारवाई केली
सरकारी नोकरी विक्री प्रकरणी सरकारनेच खरे तर पहिला गुन्हा नोंदवला होता. पोलिस या नोकऱ्या विक्री प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत काहीजणांना अटकसुद्धा झाली आहे. त्यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जात आहेत. ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तक्रारी नोंद कराव्यात, असे आवाहन सरकारने यापूर्वीच केले आहे. सरकार या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे, असेही नायक यांनी सांगितले.