प्रचाराचा श्रीगणेशा: काँग्रेसच्या बसमध्ये असंतुष्ट गैरहजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 08:50 AM2024-04-10T08:50:38+5:302024-04-10T08:51:59+5:30
विजय भिके, एल्विस गोम्स, सार्दिन यांची दांडी; आप व फॉरवर्डची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: काँग्रेसने 'इंडिया' आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फोडला. मात्र, तिकीट न मिळाल्याने अपेक्षाभंग झालेले फ्रान्सिस सार्दिन, विजय भिके, एल्विस गोम्स आदी नेत्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांचा 'असहकार आता उघड झाला आहे. दुसरीकडे गिरीश चोडणकरही पत्रादेवीला फिरकलेच नाहीत. मात्र, लोहिया मैदानावर ते उपस्थित होते.
काँग्रेसने काल पत्रादेवी येथे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रमाकांत खलप तर मडगाव येथे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांच्या प्रचारास प्रारंभ केला. तिकिटोच्छुक सुनील कवठणकर पत्रादेवीला खलप यांच्या प्रचाराला उपस्थित होते. परंतु उमेदवारीच्या बाबतीत अपेक्षाभंग झालेल्या वरील नेत्यांनी मात्र पाठ फिरवली. इंडिया आघाडीतील काँग्रेसचे मित्रपक्ष आपचे गोवा प्रमुख अॅड, अमित पालेकर, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत आदी याप्रसंगी उपस्थित होते.
काँग्रेस नेते विद्यमान खासदार सार्दिन यांनी याआधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपण आराम करणार, स्वतः निवडणूक लढवणार नाही किंवा कोणाचाही प्रचार करणार नाही, असे त्यांनी जाहीर केलेले आहे. कालच्या त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते यापुढेही विरियातो यांच्यासाठी प्रचारकार्यात उतरणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
गुळगुळीत रस्ते, नवीन पूल दिले म्हणून काँग्रेसची बस वेळेत: भाजप
गुळगुळीत रस्ते, नवीन पूल दिले म्हणून काँग्रेसची बस लवकर पोहोचली, असा टोला भाजपच्या नेत्यांनी लगावला आहे. मडगावहून पत्रादेवीला काँग्रेसचे नेते व इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचे प्रतिनिधी बसने गेले. यावर भाजप प्रवक्त्यांनी टोला हाणताना भाजपच्या डबल इंजिन सरकारने गुळगुळीत रस्ते, नवीन पूल मिळाले म्हणून बस लवकर पोहोचली आणि ते भाषणे ठोकू शकले. काँग्रेस सरकार सत्तेवर असते तर बस जुवारी पुलावर व मांडवी पुलावर अडकली असती, असे म्हटले आहे. मांडवी नदीवरील अटल सेतू आणि जुवारी नदीवरील नवीन पूल वास्तुशास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहेत. भाजपचे सुप्रशासन व मोदी की गॅरंटीची ही अनुभूती असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
१५ व १६ रोजी अर्ज भरणार
काँग्रेसने दिलेले इंडिया आघाडीचे उमेदवार आपले अर्ज दि. २५ व १६ रोजी सादर करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. ते म्हणाले की, केंद्रीय नेते, स्टार प्रचारक गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत.
मी पक्षासोबतच; परंतु काही जणांच्या हेतूबद्दल संशयः एल्विस गोम्स
एल्विस गोम्स यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी पक्षासोबतच आहे. परंतु काही स्थानिक नेत्यांच्या हेतूबद्दल संशय आहे, पाठकर प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश काँग्रेसची एकही बैठक झालेली नाहीं. उमेदवार जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी मला कोणीही माझ्याशी संपर्कही साधलेला नाही. मी तिकिटासाठी लॉचिंग केले नव्हते. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात माझ्या नावाला लोकांची पसंती होती. परंतु उमेदवारी दिली नाही म्हणून मला कोणताही फरक पडलेला नाही. मात्र, त्याचबरोबर दोघे तिघे जे स्थानिक नेते आहेत त्यांची भूमिका संशयास्पद आहे. ती आधी तपासावी लागेल.
मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही: सुनील कवठणकर
सुनील कवठणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी गेली २१ वर्षे काँग्रेसमध्ये आहे. यापूर्वी तिकीट मागितली होती; परंतु दिली नाही. त्यावेळीही मी नाराज न होता काम केले. यावेळी मी तिकीट मागितलेच नव्हते, त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्नच नाही. मी पक्षासोबतच आहे आणि पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणे ही माझी जबाबदारी समजतो. भाजप सरकारची अराजकता नेस्तनाबूद करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पत्रादेवीला जातीने उपस्थित होतो आणि यापुढेही प्रचारात सक्रिय राहणार आहे.
प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत जाब विचारणार: विजय भिके
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांची नाराजी तिकीट नाकारल्याने कायम आहे. ते म्हणाले की, प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत मी जाब विचारणार आहे. प्रदेशाध्यक्षांनी तिकीट जाहीर होण्याआधी व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रदेश समितीची बैठक घ्यायला हवी होती. समितीच्या बैठकाच झालेल्या नाहीत. प्रदेशाध्यक्ष आमच्यापासून काय लपवत आहेत? याचे उत्तर मिळाल्याशिवाय मी उमेदवाराच्या प्रचारात उतरणार नाही. मी पक्षासोबतच आहे. परंतु माझ्या काही प्रश्नांची उत्तरे स्थानिक नेतृत्वाने द्यावीत.
मला कोणीही बोलावले नाही: गिरीश चोडणकर
दक्षिण गोव्यातील तिकिटोच्छुक माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे पत्रादेवीला फिरकले नाहीत. मात्र, लोहिया मैदानावर प्रचाराला उपस्थित होते. या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला मडगावच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते तिथे मी गेलो. पत्रादेवीला कोणीही बोलावले नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी प्रचार करणार काय? असे विचारले असता गिरीश म्हणाले की, माझ्याकडे ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालैंड, मणिपूर व सिक्कीम अशा चार राज्यांची जबाबदारी असून तेथे पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असल्याने मला जावे लागत आहे.