पणजी: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या समाज कल्याण खात्याच्या इमारतीची दुर्दशा झाली असून तेथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहे. तरी सुध्दा या इमारतीच्या सुरक्षा ऑडिटकडे दुर्लक्ष का ? असा प्रश्न करुन प्रदेश कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्यावर (साबांखा)धडक मोर्चा केला.
यावेळी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना घेराव घालण्यासाठी गेले असता हे आपल्या कॅबिनमध्ये संगीत ऐकत असल्याचे आढळून आले. त्यावर कॉंग्रेसने संताप व्यक्त केला.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, की समाज कल्याण खात्याच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. सदर इमारत ही ११० वर्ष जुनी आहे. या इमारतीची दुरुस्ती करावी, म्हणून खात्याच्या अधिकाऱ्यांनी सरकार तीन पत्रे पाठवली होती. परंतु या पत्रांची कोणतीही दखल सरकारने घेतली नाही. या कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करतात. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती येथे कामानिमित रोज येतात. अशातच जर अनुचित घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी केला.?