पणजी : कोविड पॉझिटिव्ह आढळलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घरीच विलगीकरणात राहून फाइल्स हाताळत असल्याचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसारित झाल्यावर विरोधी काँग्रेस पक्षाने त्यास आक्षेप घेतला. मुख्यमंत्री हातमोजे न घालताच फाइल्स हाताळत असल्याने टीका करण्यात आली. परंतु नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्यावर खुलासा करताना प्रत्येक फाइल सॅनिटाइज केली जात असल्याचे स्पष्ट केले.
आल्तिनो येथे शासकीय बंगल्यावर मुख्यमंत्री फाइल्स हाताळतानाचा जो फोटो व्टीट केला होता, त्यात सावंत यांनी तोंडावर मास्क बांधल्याचे दिसत होते. मात्र हातमोजे घातले नव्हते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यावर लगेच आपली तीव्र प्रतिक्रिया दिली. हातमोजे न घालता मुख्यमंत्री फाइल्स हाताळत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून कोविडचा फैलाव होण्याचा धोका असल्याचे तसेच ज्या अधिकाºयांकडे तसेच कर्मचाºयांकडे या फाइल्स जातील त्यांना धोका आहे, असे चोडणकर यांचे म्हणणे होते.
बुधवारी २ रोजी मुख्यमंत्र्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ते घरीच विलगीकरणात काम करीत आहेत.
मुखमंत्री कार्यालयाचा दावादरम्यान, मुखमंत्री कार्यालयातून असा खुलासा करण्यात आला की, त्यांनी प्रत्येक फाइलवर सही करण्याआधी आणि सही केल्यानंतर असे दोनदा फाइलचे निर्जंतुकीकरण केले जाते. तातडीची कामे डिजिटल पध्दतीने हाताळली जातात. जनतेच्या आरोग्याप्रती हे सरकार जबाबदारीने आणि संवेदनशीलपणे वागत आहे.
‘भिवपाची गरज ना’ : दत्तप्रसाद नाईकदरम्यान, चोडणकर यांच्या आक्षेपाला उत्तर देताना भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यानी ‘भिवपाची गरज ना’, असे म्हटले आहे. ते म्हणतात की, ‘मुख्यमंत्र्यांकडे येणारी प्रत्येक फाइल त्यांच्याक डे सहीसाठी येण्याआधी आणि नंतर सॅनिटाइज केली जाते. खरा धोका आहे तो काँग्रेस वेळोवेळी सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन काढत असलेले मोर्चे आणि आंदोलने यातूनच!