मडगाव - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थिर आहे. ते अस्थिर करण्यासाठी काँंग्रेस नेते प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते सतत आपल्याशी संपर्क करत आहेत. एवढेच नव्हे तर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांच्याकडेही जाऊन या कॉंग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट मगोचे नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी येथे गुरुवारी केला.
तुमच्या संपर्कात नेमका कोणता कॉंग्रेस नेता होता? माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत की कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी कोणाचे नाव घेत नाही. मात्र हे सरकार पाडावे यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न चालू आहेत एवढे नक्की.पर्रीकर सरकार पूर्ण पाच वर्षे हे सरकार टिकून राहील. आमच्या कोणाकडूनही या सरकारला धोका नाही, असे ते म्हणाले. पर्रीकर काही काळासाठी विदेशात गेले होते. अन्य दोन मंत्री प्रकृतीच्या कारणावरून प्रशासनात भाग घेऊ शकत नसले तरी या सरकारात पाच सहा ज्येष्ठ मंत्री आहेत, जे इतर मंत्र्यांची कामेही स्वत: करू शकतात. आमचे मंत्रिमंडळ कार्यक्षम आहे आणि मुख्य सचिवही प्रशासन योग्य प्रकारे हाताळण्या इतपत कार्यक्षम असल्याचे ते म्हणाले. माझ्यामुळेच स्थिरता : विजय सरदेसाई आमच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने मनोहर र्पीकर यांच्या सरकारला संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच सरकार स्थिर आहे. या सरकारला माझ्यामुळेच स्थिरता आली आहे. त्यामुळेच मी विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनलो आहे. त्यामुळेच कॉंग्रेससारखे विरोधक माङयावर टीका करताहेत,अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. मडगावातील एका ‘अभिरुप न्यायालय ’ कार्यक्रमात आरोपीच्या पिंज-यात उभे केलेल्या नगरनियोजन मंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्यामुळेच सरकारे अस्थिर होतात असा त्यांच्यावर आरोप होता. त्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाई म्हणाले, खरे तर आमच्या पाठिंब्यामुळेच सरकारला स्थिरता आली आहे. पर्रीकर यांना पाच वर्षांसाठी पाठिंबा देणार असे वचन मी त्यांना दिले होते. ते वचन मी पाळणार आणि खरा गोंयकार म्हणून सिध्द करणार.