राज्यघटनेविषयी विरियातो यांच्या विधानाने खळबळ; भाजपची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 01:18 PM2024-04-23T13:18:25+5:302024-04-23T13:18:34+5:30
काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोमंतकीय जनतेवर भारतीय राज्यघटना लादल्याचा आरोप करून दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी जे विधान केले आहे, त्याचा भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी समाचार घेतला आहे.
'विरियातो यांनी केलेली टिप्पणी दुर्दैवी आहे. माजी नौदल अधिकारी म्हणून मला त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या. तरीही, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, ते सातत्याने राष्ट्रीय हितसंबंधांचा विश्वासघात करणारी भूमिका घेतात. ध्वजारोहणावेळी भारतीय नौदलाचा विरोध असो किंवा राज्यघटनेविषयीची त्यांची सध्याची टिप्पणी असो, हे अत्यंत खेदजनक आहे. इंडिया आघाडी घटनेचे समर्थन करत नाही का?, असा सवाल वेर्णेकर यांनी केला. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर विरियातो यांनी मुक्तीनंतर भारतीय घटना गोव्यावर लादण्यात आली, असे विधान राहुल गांधी यांनी २०१९च्या बैठकीत केले होते, असे सांगितले.
हा मुद्दा विरियातो यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणल्याचे प्रचारावेळी एका भाषणात म्हटले होते. दरम्यान, रात्री विरियातोंनी द्विट करून आपल्या विधानाचा विपर्यास करू नये असे म्हटले आहे.
मनोज परब यांची टीका
काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना त्याच संविधानाच्या नावाने शपथ घेतली आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की ते तुमच्यावर जबरदस्तीने लादले गेले असेल तर तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी काम कराल असे वाटत नाही, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री संतप्त
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. उलट काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे बेपर्वा भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे. काँग्रेसपासून आपल्या लोकशाहीला धोका आहे.'