गाऊ त्यांची आरती....; देवावरील श्रद्धेला तडा अन् जनभावना पायदळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 10:31 AM2023-09-17T10:31:54+5:302023-09-17T10:32:27+5:30
गेल्या ९९ सालापासून एकदा देखील उत्तर गोव्यात काँग्रेस पक्ष लोकसभेची जागा जिंकू शकलेला नाही, ही या पक्षाची मोठी शोकांतिका आहे.
- सद्गुरु पाटील
काँग्रेसचे मतदार आम आदमी पक्षाने व आरजी पक्षाने आपल्याकडे वळवले आहेत. लोकत आरजी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मते मिळवण्याची शक्यता आहे. गेल्या ९९ सालापासून एकदा देखील उत्तर गोव्यात काँग्रेस पक्ष लोकसभेची जागा जिंकू शकलेला नाही, ही या पक्षाची मोठी शोकांतिका आहे.
येत्या मंगळवारी चतुर्थीचा सण सुरु होत आहे. गेल्या १४ सप्टेंबरला आठ फुटीर आमदारांच्या पक्षांतराला एक वर्ष पूर्ण झाले. देवासमोर, सायबिणीसमोर शपथ घेऊनदेखील आमदार फुटू शकतात व पुन्हा आम्ही देवाशी बोलून मगच हे पाऊल उचलले, असे धाडसाने सांगूही शकतात. छोट्या राज्यात हे असे घडते. गणेशोत्सवावेळी (भाजपमधील) कुणी या आठ फुटीर आमदारांची आरती गायली तर आश्चर्य मानायला नको. कारण फुटीरांचा तर दावा आहे की आपण देवाशी बोलून व देवाची मान्यता घेऊनच मग भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
बरोबर एक वर्षापूर्वी ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी मीडियाला सांगितले होते की, आपण देवाकडे पुन्हा गेलो व देवाशी बोललो. स्थिती कशी आहे ते आपण देवाला सांगितले व मगच काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. कामत यांचा हा व्हीडिओ गेल्या चार दिवसांत खूपच व्हायरल झाला. लोकांनी नव्याने मनोरंजन करून घेतले. एखादा ज्येष्ठ नेता देवाचा संदर्भ देऊन कसे बोलू शकतो व आपल्या पक्षांतराचे समर्थन कसे करू शकतो, ते पूर्ण गोव्याने अनुभवले. त्यामुळेच गाऊ त्यांची आरती असे म्हणावे लागेल. देवाशी संवाद साधणारे व देवाची परवानगी घेऊन फुटणारे आमदार भारतात आणखी कुठेच सापडत नाहीत. ते गोव्यात सापडतात, म्हणून त्यांची आरती ओवाळणे क्रमप्राप्त ठरते.
गोव्यातील लोकशाहीसाठी काळा दिवस अशी टीका करत काँग्रेसने गुरुवारी १४ रोजी मडगावमध्ये निषेध कार्यक्रम केला. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येऊन लगेच जनभावनेला सुरंग लावत १४ सप्टेंबर २०१२ रोजी आमदार फुटले होते. संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, केदार नाईक, रुदोल्फ फर्नाडिस यांना जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिले नसते तर हे आमदारच झाले नसते. निवडून आल्यानंतर आम्ही फुटणार नाही अशी शपथ पणजीतील महालक्ष्मी मंदिरात या उमेदवारांनी घेतली होती. शिवाय बांबोळीतील खुरसासमोरही तशीच शपथ घेतली होती. त्यावेळी शपथ घ्यायची ही आयडियाच दिगंबर कामत यांची होती. २०२२ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन आपण मुख्यमंत्री होणार, असेच कामत यांना त्यावेळी वाटत होते. त्यामुळे त्यांनी सर्व उमेदवारांना व संभाव्य आमदारांना देवासमोर उपस्थित करून शब्द घेतला होता. पुरोहितांनी गहाणे घातले. होते. या सर्वांनी निवडणुकीनंतर देवावरील श्रद्धेला तडा दिलाच, शिवाय जनभावनेलाही पायदळी तुडविले.
काँग्रेसला गेल्या पाच वर्षांत सलग दोनवेळा मोठे धक्के बसले. एकदा बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार काँग्रेसला सोडून गेले, जे २०१७ साली काँग्रेसच्या तिकीटावर जिंकले होते. २०२२ साली आठजण सोडून गेले. तसे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे फुटले होते, तेव्हाही कॉंग्रेससाठी तो धक्काच होता; पण तो सौम्य धक्का होता. मात्र मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसला ने धक्के बसले ते फार मोठे आहेत. ते एक प्रकारे भूकंपच आहेत. येथे काँग्रेसने मनोहर पर्रीकर यांचे आभार मानायला हवेत, कारण पर्रीकर जिवंत असताना कधीच काँग्रेसचे आठ-दहा आमदार एकत्र फुटत नव्हते. पर्रीकर यांच्या निधनानंतरच काँग्रेस गोव्यात भूईसपाट होण्याच्या स्थितीत आली. याचा अर्थ असा की. पर्रीकर यांनी काँग्रेसला गोव्यात जगू दिले होते. त्यांना जेवढे आमदार हवे, तेवढेच ते भाजपमध्ये घेत होते. काँग्रेसच्या आमदारांची भाजपमध्ये प्रचंड गर्दी होणार नाही याची काळजी पर्रीकर घ्यायचे. मात्र पर्रीकर या जगातून गेले आणि भाजपने गोव्यात काँग्रेसचा निवडून येणारा प्रत्येक आमदार उचलण्याची खेळी सुरू केली. अगदी हळदोणेचे आमदार कार्लस फरेरा व केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनादेखील मुख्यमंत्री सावंत यांनी प्रस्ताव दिला होता. तुम्ही भाजपमध्ये या असे निमंत्रण कार्लस व एल्टनला देखील होते. कार्लसने मुख्यमंत्र्यांना भेटून त्या प्रस्तावाविषयी गेल्यावर्षीच चर्चा देखील केली होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. अन्यथा काँग्रेसमध्ये केवळ युरी आलेमाव हे एकमेव आमदार राहिले असते.
विरोधी काँग्रेसचे अपयश असे कीजिये आमदार फुटून जातात, त्या मतदारसंघात काँग्रेसला नवा पर्यायी उमेदवारच तयार करता येत नाही. समजा काँग्रेसने उमेदवार तयार केला, तर तोदेखील आमदार होतो व मग फुटून जातो. सांताक्रूझचे टोनी फर्नांडिस यांचे उदाहरण पहा. टोनी आमदार झाले व भाजपमध्ये गेले. मग रुदोल्फ यांनी संधी घेतली. रुदोल्फ सांताक्रुझमध्ये काँग्रेसचे आमदार झाले व तेही भाजपमध्ये गेले. काँग्रेसवाल्यांना आता सांताक्रुझमध्येदेखील आपला उमेदवार तयार करता आलेला नाही. लोकशाहीसाठी काळा 'दिवस' असे म्हणत काँग्रेस पक्ष पक्षांतराची वर्षपूर्ती करतो. मात्र गेल्या वर्षभरात महगाव, सांताक्रुझ, नुवे किंवा कळंगुट, शिवोलीतही काँग्रेसला विश्वासार्ह व प्रभावी उमेदवार तयार करता आलेला नाही.
काँग्रेसकडे संघटनात्मक बळच राहिलेले नाही. जिथे ख्रिस्ती मतदारांची संख्या जास्त आहे किंवा ४०-५० टक्के आहे. तिथे देखील काँग्रेसकडे उमेदवार नसतात किंवा नाव घेण्यासारखा मजबूत असा गट अध्यक्षदेखील नसतो. काँग्रेस पक्ष हा फक्त पत्रकार परिषदांमध्ये व मीडियातील बातम्यांमध्येच दिसून येतो. हा पक्ष गोव्यात तरी मतदारसंघांमध्ये संघटनेच्या रुपात दिसूनच येत मायकल, डिलेयला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आदी कुणीच चिंता करत नाहीत. ते थेट फुटतात व भाजपमध्ये जातात. आपण कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नंतर आपल्या मतदारसंघात उमेदवार तयारच करू शकणार नाही याची खात्री फुटीरांना असते.
गेल्या निवडणुकीत बाबू कवळेकरांचा पराभव करून एल्टन जिंकले किंवा टोनींचा पराभव करून रुदोल्फ जिंकले, पण ते स्वतः:च्या बळावर जिंकले. शिवोलीत डिलेयला लोबो यांना काँग्रेसच्या तिकीटाची खूप मदत झाली, पण त्या स्वतःची आर्थिक शक्ती व स्वतः चे बळ वापरून जिंकल्या. कॉंग्रेस पक्ष फक्त तिकीट देतो आणि नंतर उमेदवारांना वान्यावर सोडून देतो. तो उमेदवार जिंकला तर आपला पराभूत झाला तर त्याला कुणी विचारतदेखील नाही. मग काँग्रेसमध्ये त्या उमेदवारांना किंमतही असत नाही. म्हापशाचे सुधीर कांदोळकर हे याचे मोठे उदाहरण आहेत. कांदोळकर यांनी म्हापशात मोठया प्रमाणात मते घेऊन दाखवली होती, पण त्यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्याविषयी कधी प्रेम दाखवले नाही. ते देखील काँग्रेसपासून दूर गेले.
सांतआंद्रे, शिरोडा, मांद्रे, थिवी, वेली, बाणावली, पणजी, ताळगाव, फातोडा, सत्तरी, मये, डिचोली अशा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे योग्य प्रभावी, लढाऊ, प्रबळ असे उमेदवार नाहीत. शिवाय अनेक मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसकडे कार्यकर्ते, सक्रिय सदस्य नाहीत. काँग्रेसच्या गट समित्या नावापुरत्या केवळ कागदोपत्री आहेत. निरीक्षकांना प्रत्येकवेळी केवळ कागदावर काँग्रेसच्या समित्या दाखवल्या जातात. आपण आहोत म्हणून काँग्रेस पक्ष जिवंत आहे, असे काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला वाटते. त्यामुळेच ते आमदार फुटत राहतात. यापुढे देखील ही मालिका सुरूच राहील.