सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 03:16 PM2023-12-10T15:16:32+5:302023-12-10T15:17:49+5:30

काँग्रेसविरुद्ध आरजी असा सामना असेल. शिवाय भाजपविरुद्ध काँग्रेस व आरजी असाही सामना दक्षिणेत असेल.

congress vs rg and fight for the lok sabha election 2024 in south goa is more interesting | सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार

सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार

- सद्‌गुरु पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची अजून दमदार तयारी नाही. इंडिया आघाडी झाली तरी उत्तर गोव्यात आरजीचा उमेदवार काँग्रेससाठी मोठा अडथळा ठरू शकतो. आरजीचा दक्षिण गोव्यातील उमेदवार ख्रिस्ती मते फोडीलच. शिवाय हिंदू एसटी समाज व भंडारी समाजातीलही मते जर आरजीच्या उमेदवाराने प्राप्त केली तर दक्षिणेची लढत अधिक रंगतदार होईल. काँग्रेसविरुद्ध आरजी असा सामना असेल. शिवाय भाजपविरुद्ध काँग्रेस व आरजी असाही सामना दक्षिणेत असेल.

देशात काँग्रेसला मिळणारी मते झपाट्याने घटत चालली आहेत. भाजपला प्राप्त होणारी मते वाढत आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला देशात ३१ टक्के मते मिळाली होती. ३१ टक्के म्हणजे १७ कोटी १६ लाख, या उलट काँग्रेसला तेव्हा १० कोटी ६९ लाख मतांवर समाधान मानावे लागले होते. म्हणजे फक्त १९.५ टक्के मते. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती पहिली लोकसभा निवडणूक होती. मोदी यांनी विविध कल्याणकारी योजना आणून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविताना भाजपचे समर्थक तळागाळात वाढविले केवळ मोदी सरकारच काम करतेय असा भाग नाही, तर सरकारसोबत भाजप पक्ष संघटनाही देशभर काम करतेय. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व स्वयंसेवक निरपेक्ष जे काम करतात, त्याचाही मोठा लाभ भाजपला होत आहे. काँग्रेसला असा कोणताच लाभ दुसऱ्या एखाद्या सेक्युलर किंवा बिनसेक्युलर संघटनेच्या कामातून होत नाही.

२०१९ साली काँग्रेसची मत संख्या थोडी वाढली. ११ कोटी ९४ लाख मते मिळाली, पण टक्केवारीच्या तुलनेत काँग्रेसची मते ५ टक्क्यांनी कमी झाली. या उलट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मते ३१ टक्क्यांवरून ३७.५ टक्क्र्यापर्यंत वाढली, भाजपचा प्रभाव खूप वाढला. २०१४ साली १७.१६ कोटी मते
मिळविणाऱ्या भाजपने २०१९ मध्ये २२ कोटी ९ लाख मते मिळवली, काँग्रेसपेक्षा दुप्पट मते भाजपच्या पारड्यात पडली. येथे लक्षात घ्यायला हवे की, विविध राज्यांत काँग्रेस पक्ष फुटत राहिला, त्याचा लाभ भाजपला होत राहिला, काँग्रेसचे व अन्य पक्षांचे बडे नेते कधी घाबरून तर कधी मोठ्या पदाच्या अभिलाषेने तर कधी सुरक्षा कवच प्राप्त करण्यासाठी भाजपमध्ये गेले. त्यामुळे भाजपचा पाया आणखी विस्तारला. मते आणखी वाढली.

गोव्यात देखील तोच अनुभव येतो. गोव्यात भाजपची जेवढी मते आहेत, तेवढीच आणखी मते कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये उडी टाकून भाजपला दिली आहेत. यावेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी हे आकडेवारीतून अधिक स्पष्ट होईलच, भाजपची सदस्य संख्या गोव्यासह देशभर वाढली, काँग्रेसला ती वाढवता आली नाही, उलट संख्या घटली. विरोधी पक्षांचे मेंबर होण्याचे धाडस आता लोक करत नाहीत. आपले जीवन डिस्टर्ब होऊ नये याकडे प्रत्येकाचा कल असतो. तसे होणे स्वाभाविकही आहे.

छत्तीसगढमध्ये काँग्रेसची वाताहात झाली. राजस्थानमध्ये मोठा पराभव वाट्याला आला, जिथे काँग्रेसची सत्ता असते, तिथे त्या पक्षाचे नेते ती सत्ता टिकवून ठेवण्यात अपयशी ठरतात. २००७ साली दिगंबर कामत मुख्यमंत्री झाले होते. २०१२ मध्ये कामांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव झाला, पुन्हा गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आलाच नाही. कामत, बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूल, विश्वजित, आलेक्स सिक्वेरा, सुभाष शिरोडकर, रवी नाईक, संकल्प आमोणकर सगळे आता भाजपमध्ये आहेत. या सर्व नेत्यांच्या समर्थकांची मते भाजपला जर लोकसभा निवडणुकीवेळी मिळाली, तर काँग्रेसचे पानिपत करण्यासाठी भाजपला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. उत्तर गोव्यात दर लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसची धुळधाण होतच आहे.

परवा यूरी आलेमाव लोकमत कार्यालयात आले होते. त्यांच्याशी दीड तास आमचा संवाद झाला, युरी हा आलेमाव कुटुंबातील अन्य नेत्यांपेक्षा खूप वेगळा आहे. आपण वयाच्या बाराव्या वर्षापासून वडिलांचा हात धरून राजकारण खूप जवळून पाहिले, अनुभवले असे यूरीने सांगितले. सांगेत माझा फक्त २०० मतांनी पराभव झाला तेव्हा मला राजकारणाचाच कंटाळा आला होता, मला पुन्हा सक्रिय राजकारणात यायचे नव्हते. पण वडिलांच्या आग्रहाने व कुंकळ्ळीतील लोकांच्या प्रेमापोटी मी राजकारणात परतलो, असेही बिचारे युरी सांगून गेले. मी डॉक्टर व्हावे असे वडील ज्योकिम आलेमाव यांचे स्वप्न होते. पण मी विमान पायलट झालो, वैमानिक झालो.

एकदा ऑस्ट्रेलियात भयानक विमान अपघातातून वाचलो, किंचित जखमी झालो होतो, त्यामुळे वडील चिंताग्रस्त झाले. त्यांनी मला विमान चालविणे बंद करण्याचा सल्ला देऊन गोव्यात आणले, मग मी राजकारणाचाच मार्ग परत निवडला, हेही युरी प्रांजळपणे सांगतात. एकंदरीत युरीशी बोलल्यानंतर कळून आले की- लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची अजून दमदार अशी तयारी नाही. भाजपकडून जशी तयारी केली जातेय, तशी तयारी करण्याच्या स्थितीत गोव्यात काँग्रेसची संघटना नाही. काम ढेपाळले आहे. युरी सांगतात की- आता आम्ही पूर्ण गोव्यात फिरून छोट्या बैठका, सभा घेणार आहोत. आमच्या गट समित्या आहेत वगैरे. अर्थात गट समित्या नावापुरत्या आहेत हे आम्हाला मीडिया म्हणून ठाऊक आहे.

काँग्रेस पक्ष यावेळी गोव्यात जास्त डोकेफोड करणार नाही. कारण उत्तर गोवा हा भाजपचा बालेकिल्ला झालाय याची कल्पना कॉंग्रेसला आहेच, रमाकांत खलप तिकीट मागतात. मात्र त्यांना भाजप ऐनवेळी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करील, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळते. खलप हे भाजपला आता मोठे आव्हान वाटतच नाहीत. खलपदेखील थेट भूमिका न घेता थोडे दाखव-लपव पद्धतीने तिकीटावर दावा करत आहेत. गिरीश चोडणकर दक्षिणेत जोरदार फिरतात, विविध उत्सर्वाना जातात. परवा मडकईत नवदुर्गा उत्सवालाही ते गेले होते. खलप उत्तर गोव्यात तसे करत नाहीत, नख्या युवा मतदारांशी खलपांना कनेक्ट करावा लागेल, कारण मगो पक्षाचे जुने मतदार कधीच गारद झालेले आहेत. काँग्रेसचेही जुने मतदार बिचारे गारदच आहेत. गट समित्या व पदाधिकारी काम करतील व त्यांच्या बळावर आपण जिंकेन असे खलपांना वाटत असेल तर तो विनोद ठरेल. 

हळदोणेचे कार्नुस फरैरा काँग्रेसला किती मते मिळवून देतील? मुख्यमंत्री प्रमोद सावंतना विचारा, ते सांगतील, भाजपशी आतून मैत्री ठेवणारे अनेक पदाधिकारी कॉंग्रेसकडे आहेत, हे वेगळे सांगायला नको. इंडिया आघाडी झाली व उत्तरेत काँग्रेसने खलपांना तिकीट दिले, तरी आरजी पक्षाचा उमेदवारच उत्तरेत काँग्रेसपेक्षा जास्त मते काढू शकतो, असे मानणारे लोक आहेत. तृणमूल काँग्रेसची यावेळी अजून तरी वेगळी कटकट नाही, आरजी पक्ष इंडिया आघाडीत सामील होणार नाही. होऊही नये, कारण आरजीला शेवटी स्वतःचे वेगळे अस्तित्व वाढवायचे आहे. 

आरजीला दोष देता येणार नाही, दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट देण्यात अर्थ नाही काँग्रेसला तिथे नवा उमेदवार शोधावाच लागेल, भाजपने नरेंद्र सावईकर किंवा बाबू कवळेकर यांना तिकीट दिले तरी, काँग्रेसला दक्षिणेत वाट सोपी नाही. यावेळी संकल्प आमोणकसह सर्वजण भाजपमध्ये आहेत. काँग्रेसकडे दक्षिणेत फक्त दोन आमदार आहेत. त्यापैकी एल्टन व युरी आलेमाव या दोघांच्याही मर्यादा गिरीश चोडणकर किंवा एल्वीस यांनाही ठाऊक आहेत. सार्दिन यांना खासदार करण्यात गेल्यावेळी कवळेकर यांनी मोठे योगदान दिले होते. 

दिगंबर कामत वगैरे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. आरजीचा दक्षिण गोव्यातील उमेदवार खिस्ती मते फोडीलच, शिवाय हिंदू एसटी समाज व भंडारी समाजातीलही मते जर आरजीच्या उमेदवाराने थोडीफार प्राप्त केली तर दक्षिणेची लढत अधिक रंगतदार होईल, काँग्रेसविरुद्ध आरजी असा सामना असेल. शिवाय भाजपविरुद्ध काँग्रेस व आरजी असाही सामना दक्षिणेत असेल, कोण जिंकेल व कोण पराभूत होईल ते सांगता येत नाही, अशा टप्प्यावर दक्षिण गोव्याचे राजकारण उभे आहे.
 

Web Title: congress vs rg and fight for the lok sabha election 2024 in south goa is more interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.