पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: फेरीबोट भाडेवाढ करुन राज्यातील भाजप सरकार हे केवळ जनतेला लुटत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.सरकारने फेरीबोटी भाडेवाढीच्या निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा नेला जाईल असा इशारा विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी दिला आहे.
फेरीबोट भाडेवाढ तसेच दुचाकींना लागू केलेल्या तिकिट विषयावरुन कॉंग्रेसने रविवारी जुने गोवे फेरीबोट धक्क्याजवळ निदर्शने केली. यावेळी आलेमाव बोलत होते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, केपेचे आंदोलन आल्टन डिकॉस्टा,हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा, कुंभारजुवे गटाचे विशाल कळंगुटकर, अमरनाथ पणजीकर आदी उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आलेमाव म्हणाले, की भाजप सरकार हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार बनले आहे. प्रत्येक गोष्टीत ते भ्रष्टाचार करीत आहेत.राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या केवळ बॅनरवर १८ कोटी रुपये खर्च केले. कोटयावधी रुपये कार्यक्रमांच्या नावाखाली उधळले जात आहेत. तर आता फेरीबोटी तिकिट दरवाढ करुन जनतेला लुटले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे फटका बसणार असून कॉंग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. भाडेवाढीची अधिसूचना सरकारने मागे घ्यावी, अन्यथा नदी परिवहन खात्यावर धडक माेर्चा नेऊ असा इशारा त्यांनी दिला.