पणजी : राज्यात ८८ खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नुतनीकरण केल्याच्या प्रकरणात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच यांच्याविरुध्द दक्षता खाते तसेच पोलिसात तक्रार नोंदविण्याचा इशारा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत या सरकारचा भ्रष्टाचार शिगेला पोचला असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचाराचे वेगवेगळे मार्ग या सरकारने अवलंबिले असून पक्षाच्या कायदा विषयक पथकाने अभ्यास केल्यानंतर वरील निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पक्षाचे प्रवक्ते अॅड. यतिश नायक म्हणाले की, ५ नोव्हेंबर २0१४ ते १२ जानेवारी २0१५ या कालावधीत पर्रीकर आणि पार्सेकर हे मुख्यमंत्रीपदी होते. दुसऱ्यांदा झालेले ८८ खाण लीजांचे नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविताना गेल्या ७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवाड्याचा काही भाग त्यांनी उद्धृत केला. या निवाड्यात परिशिष्ट ११७ मध्ये सरकारने लीज नूतनीकरणाबाबत घिसाडघाई केल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. एमएमडीआर कायद्यात दुरुस्त्या यायच्या आधी घिसाडघाईने लीज नुतनीकरण केल्याचेही म्हटले आहे.
पार्सेकर यांनी लोकायुक्तांसमोर खाण घोटाळा संबंधी सुरु असलेल्या प्रकरणात जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्याचा हवालाही नायक यांनी दिला. पार्सेकर यांनी आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी लीज नूतनीकरणाबाबत जे धोरण अवलंबिले तेच आपण पुढे नेले असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, गोव्यात खाणबंदी पर्रीकर यांनीच केली याची पुष्टी देणाºया आणखी एका निरीक्षणाचा हवाला त्यांनी दिला. परिशिष्ट १0१ मध्ये पर्रीकर सरकारने खाणबंदी केल्याबद्दल कौतुकही करण्यात आलेले आहे याकडे त्यानी लक्ष वेधले.
कसिनो सरकारसाठी एटीएम : आरोप दरम्यान, तरंगत्या कसिनोंना सहा महिने मुदतवाढ देण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जोरदार विरोध केला. मुख्यमंत्री पर्रीकर कसिनोवाल्यांकडून पैसे घेतात, असा आरोप त्यांनी केला. चोडणकर म्हणाले की, ‘कसिनो म्हणजे या सरकारसाठी एटीएम बनले आहे. पर्रीकर यांच्या सांगण्यावरुनच मंत्र्यांनी बैठक घेतली आणि सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन टाकली. सरकारने गोवा जुगार कायदा हा केवळ जनतेच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी संमत केला आहे. प्रत्यक्षात काहीच होत नाही. रायबंदरच्या एका शाळेत कसिनोंच्या जाहिराती लागल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. कसिनोंमुळे मांडवी नदी दूषित झाली आहे. ’आम्हाला गोव्यात कसिनो नकोच, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यानी सांगितले.