काँग्रेस 'राज्यसभा' लढवणार; उमेदवारीसाठी पर्यावरणप्रेमींसह ३ नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:38 AM2023-07-06T08:38:44+5:302023-07-06T08:39:59+5:30

पक्ष प्रभारींकडून बैठक.

congress will contest rajya sabha 3 names discussed for candidacy with environmentalists | काँग्रेस 'राज्यसभा' लढवणार; उमेदवारीसाठी पर्यावरणप्रेमींसह ३ नावे चर्चेत

काँग्रेस 'राज्यसभा' लढवणार; उमेदवारीसाठी पर्यावरणप्रेमींसह ३ नावे चर्चेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी काल सायंकाळी उशिरा पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक घेतली. राज्यसभेवर पक्षाने उमेदवार द्यावा, असे बैठकीत ठरले आहे. त्यासाठी तीन नावे चर्चेत असून यापैकी एक पर्यावरणप्रेमी आहे. विधानसभेत पक्षाचे केवळ तीन आमदार असले तरी काँग्रेस राज्यसभेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. 

एका आमदाराने यास दुजोरा दिला. राज्यसभा निवडणूक लढवण्याचे तत्त्वतः ठरल्याची माहिती त्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये तीन नावांची चर्चा आहे. भाजपने प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित केले आहे. तानावडे यांची बिनविरोध निवड होऊ नये यासाठी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

प्रभारींनी याविषयी बैठकीत समितीवरील सदस्यांची मते जाणून घेतली. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव तसेच प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हेही उपस्थित होते. विधानसभेत सध्या काँग्रेसचे तीन आमदार आहेत. विरोधी बाकावर आम आदमी पक्षाचे दोन, गोवा फॉरवर्ड एक आणि आरजी एक असे एकूण सात आमदार असले तरी काँग्रेस वगळता इतर विरोधी आमदार काँग्रेसी उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता नाही. याउलट भाजपकडे स्वतःचे २८ तसेच मगोपचे दोन व अपक्ष तीन मिळून ३३ आमदार आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारच बाजी मारील हे निश्चित आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचे दिल्लीत एनडीएकडे चांगले संबंध आहेत. अलीकडेच त्यांनी दोन केंद्रीय मंत्र्यांची भेटही घेतली होती. सरदेसाई यांनी राज्यसभेबाबत आपले मत अजून व्यक्त केलेले नाही. टागोर हे गुरुवारी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेतील तसेच गटाध्यक्षांकडेही संवाद साधतील. काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही ते घेणार असून उद्या शुक्रवारी ते परततील.

दरम्यान, टागोर यांनी गोव्यातील राजकीय स्थितीची माहिती घेतली. येत्या विधानसभा अधिवेशनात पक्षाच्या आमदारांनी आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडावेत, असा सल्ला त्यांनी दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेगांव यांना या प्रतिनिधीने विचारले असता पुढील दोन दिवसात विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

Web Title: congress will contest rajya sabha 3 names discussed for candidacy with environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.