पणजी- गोव्यात काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत पण प्रदेशाध्यक्ष निवडला गेलेला नाही. काँग्रेससाठी गोव्यात प्रथमच एखादा तरुण प्रदेशाध्यक्ष दिल्लीहून नियुक्त केला जाईल अशी माहिती मिळाली आहे.
गोव्यात गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसला तरुण प्रदेशाध्यक्ष मिळालाच नाही. पन्नाशी आणि साठी ओलांडलेलेच प्रदेशाध्यक्ष आतापर्यंत गोव्यातील काँग्रेसजनांच्या वाट्याला आले. आता प्रथमच गिरीश चोडणकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, यतिश नायक किंवा अन्य एखाद्या तरुण कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाऊ शकते. काँग्रेसच्या आमदारांमध्येही तशीच चर्चा सुरू आहे. स्वत: रेजिनाल्ड, चोडणकर व यतिश नायक हे या पदासाठी इच्छुकही आहेत.
येत्या काही दिवसांत राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गोव्यासाठी नवे प्रदेशाध्यक्ष गांधी यांच्याकडूनच नियुक्त केले जाणार आहेत. प्रदेश काँग्रेस समितीवर निवडून आलेल्या सर्व समित्यांनी एका ठरावाद्वारे तसा अधिकार राहुल गांधी यांना दिला आहे.गोव्यात काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या मागे सरकारने पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे बाबू यांची अटक चुकली आहे. काँग्रेसचे अन्य एक ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मागे ईडीच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लाभले आहे. ईडीने कामत यांची बरीच मालमत्ताही नुकतीच जप्त केली आहे. एकंदरीत गोव्यात काँग्रेसच्या सर्वच आमदारांचे मनोधैर्य सध्या खचलेले आहे. अशावेळी काँग्रेसला नवे बळ प्राप्त करून देण्यासाठी गोव्यातील पर्रीकर सरकारशी निधड्या छातीने लढू शकेल अशा व प्रतिमा डागाळलेली नसेल अशाच व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
यापूर्वीच्या काळात निर्मला सावंत, रवी नाईक, लुईझिन फालेरो, जॉन फर्नांडीस आदींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेले आहे. सध्या तात्पुरते प्रदेशाध्यक्ष पद माजी खासदार शांताराम नाईक यांच्याकडे आहे.