मडगाव - मडगावचे ऐतिहासिक महत्त्वाचे लोहिया मैदान आणि निवडणुकीच्या सभा यांचे एकमेकांशी एवढे घट्ट नाते आहे की प्रत्येक निवडणुकीत पक्षाची प्रमुख सभा या मैदानावर घेतल्याशिवाय प्रचाराची सांगता केली जात नसे. मात्र यंदा प्रथमच काँग्रेस या मैदानावर सभा घेणार नाही असे संकेत मिळत असून, भाजपा व आप या दोन्ही पक्षांनी आपल्या सभेसाठी हे मैदान आरक्षित केले असले तरी काँग्रेसने अद्यापही त्यादृष्टीने काही हालचाल केलेली नाही.सध्या ख्रिश्चनांचा लेंट चालू असून, या लेंटच्या शेवटच्या आठवडय़ाला होली व्हिक असे म्हणतात. यावेळी सर्व ख्रिस्ती बांधव एक आठवडाभर धार्मिक कार्यात मग्न असतात. अगदी याच आठवडय़ात प्रचाराचे शेवटचे दिवस असून, गुडफ्रायडेनंतर दोन दिवसांनी प्रचाराला विराम मिळणार आहे. अशा परिस्थितीत प्रचार समाप्तीच्या आदल्या दोन दिवशी म्हणजे शुक्रवारी भाजपाने आपल्या सभेसाठी हे मैदान आरक्षीत केले असून त्यामुळे आप पक्षाने 13 एप्रिल रोजी या मैदानावर आपली मुख्य सभा ठेवली आहे. या परिस्थितीत काँग्रेसला जर सभा घ्यायची असेल तर इस्टर संडेला दुपारी 4 वाजेर्पयत आपली सभा घ्यावी लागणार आहे.काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांना या संदर्भात विचारले असता, मडगावात मोठी सभा घेण्याचे अजुनर्पयत काँग्रेसने ठरविलेले नाही. प्रचाराचे शेवटचे दिवस होली व्हीकमध्ये येत असल्याने तसेच इस्टर संडेलाही लोक गडबडीत असण्याची शक्यता असल्याने यावेळी बहुतेक काँग्रेस लोहिया मैदानावर आपली सभा घेणार नाही असे ते म्हणाले. तसे झाले तर आतार्पयतच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्याचवेळी काँग्रेस या मैदानावर आपली सभा घेणार नसल्याची नोंद होणार आहे.गांधी कुटुंबीयही गोव्यात येणार नाहीगोव्यातील दोन्ही लोकसभा जागा काँग्रेस जिंकणार असा दावा या पक्षातर्फे केला जात असला तरी यंदा प्रथमच गांधी कुटुंबांतील एकही सदस्य गोव्यात प्रचाराला येणार नाही असे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना यासंदर्भात विचारले असता, सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यापैकी कुणाचीही सभा गोव्याचे घेण्याचे अद्यापर्पयत ठरलेले नाही असे त्यांनी सांगितले. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत फातोर्डा येथे झालेल्या सभेसाठी सोनिया गांधी गोव्यात आल्या होत्या. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी फातोडर्य़ातून लोकांना संबोधित केले होते. मात्र दोन्हीवेळा काँग्रेसला यश आले नव्हते. गांधी कुटुंबियांच्या अनुपस्थितीत आता काँग्रेस शत्रुघ्न सिन्हा किंवा नवज्योत सिद्धू यांची सभा गोव्यात घेता येणो शक्य आहे का याची चाचपणी करत आहेत.
यंदा पहिल्यांदाच गोव्यातील लोहिया मैदानावर होणार नाही काँग्रेसची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 5:58 PM